14 November 2019

News Flash

Happy Birthday Mahesh Bhatt : ‘या’ अभिनेत्रीसाठी महेश भट्टने बदलला होता धर्म

एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती

महेश भट्ट

‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या महेश भट्ट यांचा आज ७१ वा वाढदिवस. बॉलिवूडला एकाहून एक उत्तम चित्रपट देणारे महेश भट्ट त्यांच्या चित्रपटांमुळे जितके चर्चेत असतात तितकेच ते खासगी आयुष्य आणि वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असतात. इतकंच नाही तर त्याकाळी महेश भट्ट यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा विशेष रंगल्या गेल्या होत्या. त्यांनी चक्क लग्नासाठी आपला धर्म बदलला होता.

महेश भट्ट यांची सोनी राजदानसोबतची लव्हस्टोरी साऱ्यांनाच माहित आहे. विशेष म्हणजे सोनी राजदान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता. सोनी राजदान ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी सोनी यांच्याशी लग्न केलं.

महेश भट्ट यांनी लोरिएन ब्राइट यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. काही कारणास्तव या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सोनी राजदान आल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनी राजदान आणि महेश भट्ट यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. प्रथम मैत्री आणि त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. त्यावेळी सोनी यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांना धर्म बदलावा लागला होता. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता.

दरम्यान, महेश भट्ट यांना पूजा, राहुल ,आलिया आणि शाहीन अशी चार मुलं आहेत. पुजा आणि आलिया महेश भट्ट यांच्याप्रमाणेच कलाविश्वामध्ये कार्यरत आहेत. सध्या महेश भट्ट त्यांच्या आगामी ‘सडक २’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट सडक या चित्रपटाचा रिमेक आहे.

 

First Published on September 20, 2019 11:09 am

Web Title: birthday special interesting facts about mahesh bhatt ssj 93