अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेली ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या खूपच चर्चेत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या सीरिजची तोंड भरुन स्तुती करत आहेत. परंतु राजकारणातील काही मंडळींना मात्र ही सीरिज फारशी आवडलेली नाही. ‘पाताल लोक’मधील संदर्भांवर ते वारंवार टीका करत आहेत. अशीच एक टीका गाझियाबादमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केली आहे. त्यांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘पाताल लोक’ची निर्माती आहे. तिच्याविरोधात नंदकिशोर गुर्जर यांनी एक पत्रक जारी केलं आहे. “अनुष्का शर्माने एका गुन्हेगारासोबत माझा फोटो या वेब सीरिजमध्ये दाखवला आहे. यासाठी तिने माझी संमती घेतली नव्हती. हे कृत्य करुन तिने गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे. गुर्जर समुदायाचे चूकिचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी.” अशा आशयाचा मजकूर या पत्रकामध्ये लिहिण्यात आला आहे.
क्राईम सस्पेन्स हा पाताल लोक या सीरिजचा गाभा आहे. हिंदू- मुस्लिम वाद, देशातील जातीय वाद, गरीबी, बेकारी, राजकारण, वृत्तमाध्यमांमधील स्पर्धा यांसारख्या अनेक विषयांवर ही सीरिज भाष्य करते. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले अनेक प्रसंग खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलेले आहेत. त्यामुळे काही मंडळींनी याबाबत आपला विरोध दर्शवला आहे.