dilip-thakurआठवड्यांच्या खेळात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (१९९५) जबरा यशस्वी पण सामाजिक प्रभावात ‘शोले’ (१९७५) खणखणीत यशस्वी. भारतीय संवेदनशीलता विचारात घेतली तर ‘मदर इंडिया’ (१९५८) सर्वोत्तम पण समाजाला आपलेसे केले ते ‘हम आपके है कौन’ने (१९९४) आणि अगदीच आजच्या काळानुसार गल्ला पेटीवरील शंभर दोनशे तीनशे… कोटींच्या कमाईच्या मोठ-मोठ्या आकड्यांचा खेळ मांडायचा तर ‘थ्री इडियट्स’चा विक्रम ‘सुलतान’ने मोडला. वगैरे प्रत्येक मोठ्या चित्रपटाच्या यशासह नवा विक्रम प्रस्थापित होत आहे. चित्रपटाचे खरे वा अस्सल यश कशात? प्रेक्षकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचलेले चित्रपट म्हणून ‘मदर इंडिया’, ‘शोले’ व ‘जय संतोषी माँ’ (१९७५) यांचा खास उल्लेख हवाच. शोले तर आपल्या देशाची जणू लोककथा म्हणूनही नावाजला जातो. पण आठवड्यात यश मोजायचे तर ‘दिलवाले दुल्हनिया…’ आजही दक्षिण मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटिनी खेळात ११०० व्या आठवड्यात सुरु आहे. १९ ऑक्टोबर १९९५ रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्ताला प्रदर्शित झालेला हा चित्रपट तब्बल एकवीस वर्षानंतरही चित्रपटगृहात मुक्कामाला आहे याचाच अर्थ या चित्रपटाने रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही आपला प्रवास कायम ठेवलाय. एकूणच जगभरात एखाद्या चित्रपटाने इतका दीर्घ काळ मुक्काम करणारे हे एकमेव उदाहरण. या चित्रपटाने पहिले पन्नास आठवडे न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात पूर्ण केल्यानंतर त्याचा मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटिनीला सुरु झालेला प्रवास चक्क आजही कायम आहे… हा नवा विक्रम प्रस्थापित होत आहे. पण तब्बल एकेचाळीस वर्षानंतरही विविध संदर्भात ‘शोले’ सुरु आहे ते यश यापेक्षाही मोठेच म्हणायला हवे. अगदी रिअॅलिटी शोमधील नृत्य वा विनोदापासून ते अगदी राजकारणातील एखाद्या कोटी अथवा संदर्भापर्यंत आणि जाहिरातपटापासून ते अगदी फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील गब्बर, बसंती यांची रुपे घेण्यापर्यंत सगळीकडे आजही ‘शोले’ सुरु आहे. म्हणजेच रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडूनदेखील शोलेचा प्रभाव कायम राहिलाय. ‘शोले’तील संवाद वगैरे गोष्टींशी नंतरची पिढी देखील सतत जोडलेली राहिली हे यश न मोजता येण्यासारखे आहे.

गुणवत्तेत ‘शोले’ न आवडणारे समीक्षक व प्रेक्षक त्या काळातही होते. तात्कालिक समीक्षकांकडून ‘शोले’वर भरपूर टीका झाली. हिंसक चित्रपट वा लांबलेला रक्तरंजित चित्रपट असेच अनेक समीक्षकांचे मत होते. पण चित्रपट असा व इतका लोकप्रिय झाला की शोले न पाहणारा प्रेक्षक सापडणे अवघड झाले. मिनर्व्हा चित्रपटगृहात ७० एम एम व स्टिरिओफोनिक साऊंड यात ‘शोले’ पाहाणे रोमांचक अनुभव ठरे. म्हणूनच तर गावावरून मुंबईला आलेल्या पाहुण्याला शोले दाखवणे सामाजिक सांस्कृतिक सवय वा गरज झाली होती. तेव्हा चित्रपट पाहण्यास प्रामुख्याने एक पडदा चित्रपटगृह हाच एकमेव मार्ग होता. मुंबईत दूरदर्शनचे (१९७२) आगमन झाले होते तरी सुरुवातीला काही वर्षे त्याचे प्रक्षेपण फक्त सायंकाळी सहा ते रात्रौ दहा याच काळात असे. ‘शोले’च्याच पुढील शुक्रवारी झळकलेल्या ‘जय संतोषी माँ’ पौराणिक चित्रपटाने शोलेच्या अभूतपूर्व वातावरणातही लोकप्रियता संपादली याचेही केवढे कौतुक. ते दिवस शहराकडून ग्रामीण भागाकडे सावकाशपणे चित्रपट प्रदर्शित होण्याचे होते. त्यामुळेच गावागावातून मुद्रित माध्यमातून येणार्‍या शोलेच्या गोष्टींवर समाधान मानावे लागे. एखाद्या चित्रपटाचे यश असेही विचारात घ्यायला हवेच.

‘दिलवाले दुल्हनिया…’ येईपर्यंत चित्रपट व समाज यात केवढा तरी बदल झाला. इतका की या चित्रपटाचे नाव डीडीएलजे असे इंग्रजी शार्ट फॉर्म करणे सुरु झाले व ते तात्कालिक युवा पिढीने आनंदाने स्वीकारले. तो एक ट्रेन्ड होऊन गेला. एव्हाना दरम्यान रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ (१९८२) व उपग्रह वाहिन्यांचेही (१९९१) यांचे आगमन झाले. व्हिडिओ थिएटर ही संस्कृतीही रुजली होती. खुली अर्थ व्यवस्था व जागतिकीकरण यांचेही वारे समाजात रुळत होते. या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठाच बदल म्हणजे चित्रपट ही सामान्य माणसाची भावनिक व मानसिक गरज ही ओळख व ताकद हळूहळू मागे पडत चालली होती (विशेषत: चित्रपटगृहात येणाऱ्या टाळी शिट्टी वाजवायच्या संदर्भात) आता चित्रपट ही नवश्रीमंत व उच्चभ्रू सुखासीन वर्गाची गरज होत चालली होती. डीडीएलजे तर संपूर्णपणे इंग्लंडमध्ये घडतो. हाच काळ युरोप अमेरिकेत भारतीयांची पुढची पिढी वयात येण्याचा व त्याना वतन की याद म्हणजेच भारताची आठवण येणारा होता. शाहरुख खान याच वर्गासह कार्पोरेट पिढीचा हिरो म्हणून लोकप्रिय होत होता. हे सगळेच डीडीएलजेच्या पथ्यावर पडणारे होते.

पण तरी इतका काळ चित्रपटाने मुक्काम करावा? अगदीच अलीकडे तर जबरा हिट ठरलेले असे बाजीराव मस्तानी, सुलतान, रुस्तम यासारख्या चित्रपटांचीही गर्दी चवथ्या पाचव्या आठवड्यात ओसरतेय. प्रेम रतन धन पायो, धोनी अनटोल्ड स्टोरी, शिवाय, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक चित्रपटांचा पहिल्या तीनच दिवसांचा व्यवसाय महत्वाचा झाला. आता पिकू अथवा पिंक यासारखे चित्रपट वगळता चित्रपटाच्या गुणवत्तेचीही चर्चाच होत नाही. फार पूर्वी चित्रपट फक्त रोप्यमहोत्सवी वा सुवर्ण महोत्सवी यश संपादन करून त्यांची रिळे कायमची डब्यात वा गोडाऊनमधे जात नसत. त्याचा प्रभाव इतका व असा असे की त्याच्या संदर्भातील किती तरी गोष्टी एका पिढीकडून पुढच्या पिढीत जात राहिल्या हे यश कसे मोजणार? ‘दो आँखे बारह हाथ’, ‘मुगल ए आझम’, ‘श्री ४२०’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘जिस देश मे गंगा बहती है’, ‘गाईड’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहेब बिवी और गुलाम’, ‘जागते रहो’, ‘दो बिघा जमीन’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘आराधना’, ‘गुमराह’, ‘दो रास्ते’, ‘उपकार’, ‘शोर’, ‘निशांत’, ‘अंकुर’, ‘आनंद’, ‘नमक हराम’, ‘अभिमान’, ‘आंधी’, ‘मौसम’, ‘अपने पराये’, ‘दीवार’, ‘उमराव जान’, ‘सागर’… ही नावे संपणारी नाहीत. तेच तर चित्रपटाचे अस्सल व खरे यश. ते आठवड्यात वा गल्ला पेटीवरील महाउच्चांकापेक्षाही खूपच मोठे आहे…

दिलीप ठाकूर