हंसिका मोटवानी या अभिनेत्रीचा महा नावाचा एक सिनेमा येतो आहे. या सिनेमाच्या पोस्टरवरून एक वाद निर्माण झाला आहे. कारण या सिनेमाच्या पोस्टरमध्ये हंसिका मोटवानी चिलीम ओढताना दिसते आहे. नेमक्या याच मुद्द्यावरून तिच्याविरोधात आणि सिनेमाच्या दिग्दर्शकाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हंसिका मोटवानी ही याआधी याच वर्षात प्रभूदेवाच्या गुलेबागावाली या दाक्षिणात्य सिनेमात झळकली होती. या सिनेमाने फारसा व्यवसाय केला नाही. आता ती महा या सिनेमात झळकणार आहे. मात्र सिनेमा येण्याआधीच त्यावरच्या पोस्टरने वाद निर्माण झाला आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि दिग्दर्शक यू. आर. जमिल या दोघांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात महा या सिनेमाची दोन पोस्टर्स प्रकाशित करण्यात आली. त्यातील एका पोस्टरमध्ये हंसिका मोटवानी एका सिंहासनासारख्या आलीशान खुर्चीवर बसली आहे. भगवी वस्त्रे परिधान करून ती चिलीम ओढते आहे असे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे. याच पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे.

पट्टाली मक्कल काछीचे जानकीराम यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. या पोस्टरमधून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. हंसिका मोटवानी आणि सिनेमाचा दिग्दर्शक या दोघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.