28 November 2020

News Flash

नवरंजन फलाटावर मालिकांची गर्दी

डिसेंबरमध्येही ओटीटीवर नवीन वेबमालिका आणि चित्रपटांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळते आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

आठ महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांमध्ये डिसेंबर महिन्यात नवीन चित्रपटांचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे आत्तापर्यंत ओटीटी माध्यमांवर अडकून असलेला प्रेक्षकांचा मनोरंजनाचा काटा पुन्हा चित्रपटगृहांकडे वळतो आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. पण प्रेक्षकांच्या या बदलत्या समीकरणांकडे लक्ष न देता दिवाळीपासूनच ओटीटीवर नवनव्या वेबमालिकांचा एकच सिलसिला सुरू झाला आहे. डिसेंबरमध्येही ओटीटीवर नवीन वेबमालिका आणि चित्रपटांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळते आहे.

यंदा करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे बहुतांशी लोक घरीच असल्याने ओटीटीवर वेब मालिका तसेच चित्रपट पाहण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढले. ही वाढती प्रेक्षकसंख्या लक्षात घेत सरत्या वर्षांतही मनोरंजनाचा हा धमाका असाच कायम राहावा यासाठी ओटीटी माध्यमांनी कंबर कसली आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी तसेच झी ५ या चार ओटीटी माध्यमांवर नवीन आशय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ओटीटी माध्यमांवर या महिन्याभरात प्रदर्शित झालेल्या ‘ल्यूडो’, ‘छलांग’, ‘मिसमॅच’, ‘लक्ष्मी आश्रम २’ यांसारख्या वेबमालिका आणि चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. आता नोव्हेंबरच्या अखेरीस भूमी पेडणेकरचा ‘दुर्गावती’ हा चित्रपट, ‘नक्सलबारी’, ‘डार्क ७ व्हाईट’, ‘ब्लॅक विडोज’, ‘पौरुषपूर’ या नवीन वेबमालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. २४ नोव्हेंबरला आल्ट बालाजीवर ‘डार्क ७ व्हाईट’ ही वेबमालिका प्रदर्शित होते आहे. गुन्हेगारी आणि रहस्य प्रकारात मोडणारी ही वेब मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते आहे. सुमीत व्यास, निधी सिंग आणि जतीन शर्मा अशा तगडय़ा कलाकारांची फौज यात पाहायला मिळेल. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहणारा एक राजकारणी नेता आणि त्याचे सहकारी यांच्याभोवती या मालिकेची कथा फिरते. एकेक करत त्याच्या सहकाऱ्यांचा मृत्यू होतो आणि त्याचा तपास करताना हळूहळू मालिकेचे कोडे उलगडत जाते.

परदेशी प्रेमकथांचे निस्सीम चाहते असलेल्यांसाठी नेटफ्लिक्सवर ‘व्हर्जिन रिव्हर’ या वेबमालिकेचा दुसरा भाग २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे. आपल्या भूतकाळाला कंटाळून एक नर्स व्हर्जिन रिव्हर या छोटय़ाशा दुर्गम गावात येते. तेथे चांगल्या-वाईट घटनांचा सामना करत ती अनेक लोकांचे प्राण वाचवते. मोकळा स्वभाव, मेहनत आणि कामात असलेली हुशारी या गुणाच्या जोरावर अल्पावधीतच तेथील लोकांचे प्रेम संपादन करते. मात्र सर्व चांगले सुरू असताना तिच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे मध्येच ती ते गाव सोडून जाते. यापुढील कहाणी प्रेक्षकांना दुसऱ्या भागात पाहायला मिळेल.

मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गडचिरोली येथील नक्षलवाद हा नेहमीच हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. यावर अनेक चित्रपट, हिंदी मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. पार्थो मित्राचे दिग्दर्शन असलेली ‘नक्सलबारी’ ही वेबमालिकाही  यावर आधारित आहे. राजीव खंडेलवाल, सत्यदीप मिश्रा, शक्ती आनंद अशा मुरलेल्या कलाकारांकडून काही तरी वेगळे पाहायला मिळेल अशी आशा आहे.

टी सीरिजची निर्मिती असलेल्या ‘दुर्गावती’ या भयपटातून भूमी पेडणेकर वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून तर हा ‘कॉन्जुरिंग’ अथवा ‘अ‍ॅनाबेला’ या भयपटांच्या पठडीतील वाटतो. सतत विविध भूमिका करणारी भूमी आता ‘दुर्गावती’मधून काय कमाल करते हे लवकरच समजेल. कपटी, हरामखोर, नवऱ्यांविरुद्ध कटकारस्थान करत त्यांची हत्या करून मजेत आयुष्य जगणाऱ्या तीन विधवांची कहाणी ‘ब्लॅक विडोज’ या वेबपटात मांडण्यात आली आहे. स्वस्तिका मुखर्जी, शमिता शेट्टी आणि मोना सिंग या यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. खूप काळानंतर अशा प्रकारचा आशय ओटीटी माध्यमावर पाहायला मिळणार आहे, मात्र यासाठी प्रेक्षकांना पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल. एका राजमहालातून अचानक गायब होणाऱ्या स्त्रियांची गोष्ट ‘पौरुषपूर’ या मालिकेत दाखवण्यात येईल. या व्यतिरिक्त ‘द मिडनाईट स्काय’, ‘नेल पॉलिश’, वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नं. १’ हा चित्रपट आणि अरविंद अडिगा यांच्या बेस्टसेलर पुस्तकावर आधारित ‘द व्हाईट टायगर’ हे वेब चित्रपटही या डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:02 am

Web Title: crowd of new web series and movies on ott even in december abn 97
Next Stories
1 स्वप्निल म्हणतो.. ‘चला हवा येऊ द्या’
2 मराठी सिनेसृष्टीची दुबईतून नवी सुरुवात
3 कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक, एनसीबीची कारवाई
Just Now!
X