ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर एकिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली दिली गेल्याचं पाहायला मिळालं तर, दुसरीकडे मात्र चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं. विजय चव्हाण गेले काही दिवस आजारी असून, त्यांची प्रकृती अस्वस्थ होती, त्यावेळी त्यांची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी कोणी गेलं होतं का? असा प्रश्न कुंडलकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून मांडला होता. त्यावरच काही सेलिब्रिटींनी आपलं मत मांडलं. पण, आपण त्या पोस्टवर येणाऱ्या सर्व प्रतिक्रियांचं स्वागत करतो असंच कुंडलकर यांनी स्पष्ट केलं.

ही पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाल्यानंतर अभिनेते आदेश बांदेकर यांनी कुंडलकरांना प्रत्युत्तर देत आपण गेल्या काही दिवसांपासून विजूमामांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत होतो, असं सांगितलं. त्या मागोमागच अभिनेता जितेंद्र जोशी यानेही फेसबुकवरुनच कुंडलकर यांना सडेतोड उत्तर दिलं.

वाचा : तुम्हाला नसलेलं सोयर सुतक आम्ही पाळलं, विजय चव्हाणांवरील कुंडलकरांच्या पोस्टला जितेंद्रचं सडेतोड उत्तर

विजय चव्हाण यांचा उल्लेख ‘मामा’ म्हणून करण्यामागे आमचे संस्कार आहेत, असं म्हणत आपल्या पोस्टला कालच उत्तर देणार होतो. पण, तुम्हाला नसलेलं सोयर सुतक आम्ही पाळलं असं म्हणत त्याने या पोस्टवर आपलं स्पष्ट मत मांडलं. त्याविषयीच कुंडलकर यांच्याशी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने संपर्क साधला असता, जितेंद्र हा खूप चांगला अभिनेता असून तो माझा फारच चांगला मित्र आहे आणि मी त्याच्या मताचा आदर करतो. तो त्याच्या ठिकाणी योग्यच आहे, असं म्हणत ‘जितू आणि मी स्वतंत्र विचारांची माणसं आहोत, त्यामुळे एकमेकांची मतं वेगळी असूच शकतात. मी त्याच्या मताचा प्रचंड आदर करतो, मला त्याचं म्हणणंही पटतं. पण, माझं विचाराल तर एकदा एखादी पोस्ट केल्यानंतर मी ती पोस्ट पुन्हा नाही पाहात. त्यामुळे मी अद्यापही जितूची प्रतिक्रिया पाहिलेली नाही. पण, तो जे काही म्हणाला यावषयी मला प्रचंड आदर आहे’, असं ते म्हणाले. त्याशिवाय आदेश बांदेकर यांच्या वक्तव्याविषयीसुद्धा मला आदर असून, इतरांप्रती असणारी त्यांची तळमळ मी जाणतो, हे त्यांनी स्पष्ट केलं.

ही पोस्ट पाहिल्यानंतर ज्या कोणा आपली मतं मांडली आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मताचा आदर करावा, कोणी कोणाचा अपमान करु नये, बिभत्स भाषेचा वापर करु नये असंही ते म्हणाले.