रेश्मा राईकवार

प्रेम आणि लग्नाच्या बाबतीतला तरुण पिढीचा गोंधळ, तेच ते बोहल्यावर उभे राहीपर्यंत हा की तो किं वा ही की ती.. हा गोंधळ आणि मग त्यातून खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होण्यापर्यंतचा प्रवास वगैरे वगैरे ठोकताळ्यांवर कितीतरी पद्धतीने चित्रपट बनवून झाले आहेत. आणि हा गोंधळ प्रेमपटांचा सिलसिला यापुढेही असाच सुरू राहणार आहे. हे सगळे मान्य करूनही ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला आणि लग्नाची ठोकळेबाज गोष्ट सांगणारा ‘गिनी वेड्स सनी’ हा चित्रपट अजिबातच पचनी पडत नाही. सध्या ओटीटीवर आशय, विषय आणि चित्रप्रकारातील वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असताना अशा प्रवाहात एखादाही टुकार चित्रपट हा खडय़ासारखाच बोचत राहतो.

पुनीत खन्ना दिग्दर्शित ‘गिनी वेड्स सनी’ या चित्रपटातील मुख्य जोडी पाहिल्यानंतर खरे म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, असा अंदाज होता. यामी गौतम आणि विक्रांत मस्सी ही तशी नेहमीच्या मसालापटांमधून दिसणारी कलाकारांची जोडी नाही. यामीने याआधी अनेक व्यावसायिक मसालापट के ले असले, तरी विक्रांतने मात्र निवडक आणि वेगळ्या चित्रपटांतून बहुतांशी भूमिका के ल्या आहेत. त्यामुळे हे दोघे तद्दन मसालापटात कशा पद्धतीने वावरतात, याची उत्सुकता होती. पण मुळात चित्रपटाची कथाच इतकी ठोकळेबाज आहे की या दोघांनाही यात करण्यासारखे काही नाही. यामीने साकारलेली गिनीची व्यक्तिरेखा ही त्यातल्या त्यात सनीच्या व्यक्तिरेखापेक्षा जास्त कणखर आणि आधुनिक तरुणीची प्रतिनिधित्व करणारी आहे. दिल्लीतले मनमौजी वातावरण, तिथले पंजाबी आणि भव्यदिव्य प्रेम-लग्नसोहळ्याच्या गोष्टी याची रेलचेल यात पाहायला मिळते. सनीच्या (विक्रांत मस्सी)वडिलांनी त्याचे रेस्टॉरन्ट सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मान्यता दिली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी त्याला लग्नाची अटही घातली आहे. प्रेम किं वा मुली पटवणं हे आपल्या क्षमतेबाहेरची गोष्ट आहे, याची खात्री असलेला सनी के वळ रेस्टॉरन्टचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलींच्या भेटीगाठी घेतो आहे. तर गिनी (यामी गौतम) फॅ शनेबल, स्वाभिमानी, एरव्ही रोखठोक बोलणारी तरुणी. मात्र प्रेमाच्या बाबतीत तिची सुई तिचा पक्का मित्र असलेल्या निशांतवर अडकलेली आहे. आपल्या दोघांमध्ये नक्की मैत्री आहे की आपल्यात प्रेमाचे घट्ट बंध आहेत, याबद्दल ना गिनीला खात्री आहे ना निशांतला.. या टोकाच्या परिस्थितीत सनी आणि गिनीच्या मनातला आणि आयुष्यातला गोंधळ कमी करून त्यांचे लग्न व्हावे म्हणून दोघांचेही आईवडील आपापल्यापरीने तो वाढवतच नेतात.

‘गिनी वेड्स सनी’ या नावातच चित्रपटाची कथा दिग्दर्शकाने स्पष्ट के ली आहे, त्यामुळे शेवट गोड होणार याची खात्री प्रेक्षकांना सुरुवातीच्या फ्रे मपासून असते. फक्त नायक-नायिका कशा पध्दतीने भेटणार आणि विवाहवेदीपर्यंत पोहोचणार हेच पाहण्यासाठी आपण सरसावून बसलेलो असतो. पण त्यांच्या भेटीगाठी, एकमेकांबरोबरचे रुसवेफुगवे यात नवीन काहीच जाणवत नाही. खरंतर या चित्रपटात एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत. विक्रांत आणि यामीच्या बरोबरच सनीच्या वडिलांची भूमिका करणारे राजीव गुप्ता आणि गिनीच्या आईच्या भूमिके त आयेशा मिश्रा हे सगळेच चांगले कलाकार आहेत. विक्रांतनेही आजवर अशा तद्दन भूमिका के ल्या नसल्या तरी त्याने ही भूमिका चांगली वठवली आहे. पण चांगले कलाकार असूनही या चित्रपटातली एकही व्यक्तिरेखा आपल्या लक्षात राहत नाही किं वा साधी आवडतही नाही. त्यातल्या त्यात गिनी आणि तिच्या मित्रातलं नातं चांगलं वाटतं, पण मूळ कथा यशस्वी करण्यासाठी कथेतल्या या तिसऱ्याबरोबरच्या नात्याची कथाच समाप्त करून टाकली आहे. जणू तोच काय त्यांच्या मनातला एक गोंधळ होता जो दिग्दर्शकाने कमी के ला. शेवटपर्यंत सुरू राहिलेला होय-नायचा गोंधळ अगदीच ताणला आहे. विसविशीत कथा हेच या फसलेल्या प्रेमपटाचे मुख्य कारण म्हणता येईल. ठोकळेबाज प्रेमपटांच्या प्रवाहातला हा आणखी एक नव्या माध्यमावरचा वेबपट एवढेच काय ते लक्षात राहील.