बॉलिवूडमध्ये दर्जेदार कथानकांचे चित्रपट येत नाहीत अशी टीका करणाऱ्यांवर दिग्दर्शक शूजित सरकार चांगलाच संतापला आहे. ‘ऑक्टोबर हा चित्रपट पाहिला नसेल तर आता ‘मुल्क’ तरी बघा,’ असं त्यानं म्हटलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्याने राग व्यक्त केला आहे.

शूजितच्या ‘ऑक्टोबर’ या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर थंड प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनी चित्रपटाच्या कथेचं कौतुक केलं, मात्र बऱ्याच प्रेक्षकांनी त्याची कथा संथ असल्याची टीका केली होती. आता ‘मुल्क’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

वाचा : निराधारांना आधार देणाऱ्या बाळूमामांचं चरित्र लवकरच छोट्या पडद्यावर

‘संथ गतीचा आणि उदासवाणा होता म्हणून ‘ऑक्टोबर’ पाहिला नसेल तर ठीक आहे. पण आता जा आणि ‘मु्ल्क’ तरी बघा. या चित्रपटात महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाष्य केलं गेलं आहे. कलाकारांनीही दमदार कामगिरी आहे. मित्रांनो, जा आणि चित्रपट बघा. नंतर तक्रार करू नका की बॉलिवूडमध्ये चांगल्या मुद्द्यांवर चित्रपटच बनत नाहीत,’ असं ट्विट त्याने केलं आहे.

‘मुल्क’ या चित्रपटात ऋषी कपूर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहशतवाद, घातपात, हिंदू मुस्लीम वाद, हा मुल्क कुणाचा असे धगधगते प्रश्न या चित्रपटात हाताळले आहेत.