बॉलीवूडमधील सुपरस्टारचे अवाच्या सव्वा मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या वर्षी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची ‘मोहेंजोदारो’ची घोषणा केली. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी हृतिक रोशनचे नाव निश्चित झाले तेही ५० कोटी रुपये मानधन देण्याच्या शर्तीवर.. तेव्हाच खरे म्हणजे बॉलीवूडजनांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. या चित्रपटामुळे हृतिक रोशन हा सर्वाधिक मानधन घेणारा बॉलीवूडमधील कलाकार ठरणार आहे असेही बोलले जाते. मात्र सध्या तरी त्याच्या या अवाच्या सव्वा मानधनामुळे गोवारीकर यांचा चित्रपट चांगलाच अडचणीत आला आहे.
ख्रिस्तपूर्व २६०० काळातील सिंधू संस्कृतीचा शोध हा ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाचा विषय आहे. त्यामुळे व्हीएफएक्स हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार हे निश्चित होते. चित्रीकरणासाठीचे लोकेशन्स, विविध तंत्रज्ञांची घ्यावी लागणारी मदत हे सगळे गणित लक्षात घेता चित्रपटाचे बजेट १०० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले. हा चित्रपट आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स आणि डिस्ने यूटीव्ही यांची एकत्र निर्मिती आहे. मात्र एवढे सगळे असूनही हृतिकचे ५० कोटी रुपये दिल्यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर चांगलेच अडचणीत येणार आहेत. हृतिकला ५० कोटी रुपये देणार की नाही, याबद्दल अजूनही कोणी सांगितलेले नसले तरी खुद्द हृतिकने हे वृत्त नाकारले नव्हते. चित्रपटाच्या एकूण बजेटपैकी अर्धा वाटा हा मानधनापोटी हृतिकला द्यावा लागणार असल्याने चित्रपटाच्या व्हीएफएक्ससाठी लागणाऱ्या पैशाचे गणित निर्माता-दिग्दर्शकांसाठी अवघड होऊन बसले असल्याचे बोलले जाते.
‘मोहेंजोदारो’च्या चित्रीकरणाचे पहिले सत्र जानेवारीपासून भूजमध्ये सुरू झाले होते. याआधी हृतिकला त्या काळातील लोकांप्रमाणे लुक देण्यासाठीही खास प्रशिक्षण देण्यात आले होते. मेमधले पहिले सत्र संपवल्यानंतर चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या चित्रपटात हृतिक २० फूट लांब मगरीशी झगडताना दिसणार आहे. या दृश्याबरोबरच अन्य काही प्रसंगांसाठीही मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्सची गरज भासणार आहे. चित्रपटाची संकल्पनाच भव्य असल्याने निर्मितीच्या खर्चाचाही आकडा हळूहळू फुगत चालला आहे. या सगळ्या परिस्थितीत चित्रपटाच्या बजेटसाठी आलेल्या पैशांमधून निम्मा पैसा हृतिकला दिल्यानंतर बाकीच्या गोष्टींचे गणित जमले नसल्याने आशुतोष गोवारीकरच्या चित्रपटाची कोंडी झाली असल्याचे बोलले जात आहे. आशुतोषची कोंडी सोडवण्यासाठी हृतिकच पुढाकार घेणार की नाही हे लवकरच कळेल.