गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड यांवर आधारित मालिका, चित्रपट, वेब सीरिज हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे असतात. मुंबईतील ९०च्या दशकातील डॉन आणि गँगस्टर्स पाहण्यासाठी कायम उत्सुक असलेल्या प्रेक्षकांसाठी ऑल्ट बालाजी आणि झी5 क्लब यांनी ‘मुम भाई’ हा शो आणला आहे. नुकताच या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘मुम भाई’च्या ट्रेलरमध्ये मुंबई हे शहर कशा प्रकारे गुन्हेगार आणि गँगस्टर्स यांच्यामुळे त्रासले होते हे दाखवण्यात आले आहे. या स्वप्नांच्या शहरात उगवणाऱ्या भीतीच्या वातावरणापासून शहराला वाचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. दरम्यान दोन बालपणीच्या मित्रांचे आयुष्य देखील दाखवण्यात आले आहे. भास्कर आणि रामा शेट्टी कायद्याच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना उभे राहतात. भास्कर हा पोलिस प्रशिक्षण घेऊन मुंबईचा टॉप एन्काऊंटर स्पेशालिस्ट होतो. त्यावेळी आपला जवळच्या आणि आता अंडरवर्ल्ड डॉन झालेल्या आपल्या मित्राविरोधात कारवाई करताना त्याला खूप त्रास होत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी बनवलेला हा शो तुरूंग, सत्ता, पैसा, राजकारण, एन्काऊंटर्स या सर्व घटकांना अभूतपूर्व पद्धतीने स्पर्श करतो.

येत्या ६ नोव्हेंबर पासून ऑल्टबालाजी आणि झी5 क्लबवर प्रदर्शित होणार आहे. ‘मुम भाई’ हा एक क्राइम ड्रामा आहे, जो मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये तुम्हाला घेऊन जातो. ही कथा एक पोलिस आणि गुन्हेगारातील मैत्री दाखवते जी १९८० च्या नंतरच्या कालावधीपासून २००० च्या सुरूवातीचा काळ दाखवणारी आहे.