चित्रपट उद्योगाविरुद्ध ‘बेजबाबदार, मानहानीकारक आणि अपमानास्पद’ प्रसारण करण्यापासून, तसेच या उद्योगातील व्यक्तींविरुद्ध ‘मीडिया ट्रायल्स’ घेण्यास रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांना प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका बॉलिवूडमधील आघाडीच्या निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र ही याचिका दाखल करणे म्हणजे बालिश असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी दिली. या प्रकरणाची तुलना त्यांनी थेट शालेय जीवनाशी केली.

‘बॉलिवूडकडून ही प्रतिक्रिया खूप उशिरा आणि खूप थंड आहे. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणं म्हणजे एका शाळेतल्या मुलाने शिक्षकाकडे जाऊन, ‘टिचर, टिचर, तो अर्णब मला शिवी देतोय’ असं तक्रार करण्यासारखं आहे,’ असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं.

काय आहे प्रकरण?

चित्रपटाशी संबंधित व्यक्तींच्या खासगीपणाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यापासून या वाहिन्यांना रोखावे, अशी मागणी बॉलिवूडमधील चार संघटना तसेच आघाडीच्या ३४ निर्मात्यांनी केली. ‘बेजबाबदार, मानहानीकारक आणि अपमानास्पद’ वृत्तांचे प्रसारण करू नये असे निर्देश रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी आणि पत्रकार प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे प्रमुख संपादक राहुल शिवशंकर आणि समूह संपादक नाविका कुमार यांना तसेच समाजमाध्यमांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.