अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष पथकाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली.

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि आचारी केशव बचनेर यांचीही चौकशी करण्यात आली. सोमवारपासून सीबीआय सुशांतच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात आर्थिक अफरातफरीबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने मुंबई-गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या यांना समन्स जारी करून सोमवारी चौकशीसाठी बोलावले. आर्या आपल्या आईसोबत रविवारी संध्याकाळी गोव्याहून मुंबईत दाखल झाले.

रियाने भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले (डिलीट केलेले) व्हॉट्सअ‍ॅप संदेश ईडीने प्राप्त केले. या संदेशांवरून रिया अमली पदार्थाचे सेवन आणि व्यवहाराशी संबंधित होती, असा तर्क ईडीने काढला. आर्या रियाला अमली पदार्थ पुरवत होते, असा संशय ईडीला आहे. ईडीने ही माहिती पुरविल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) स्वतंत्रपणे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्यामुळे ईडीनंतर एनसीबी आणि सीबीआयही आर्या यांच्याकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.

१४ जूनला सुशांत वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत दोन महिने चौकशी केली. या काळात पोलिसांनी ५६ व्यक्तींचे जबाब नोंदवले. मात्र सुशांतच्या वडिलांनी यांनी मुंबई पोलिसांची चौकशी दिशाहीन असल्याचा आरोप करत बिहार पोलिसांत तक्रार नोंदवली. बिहार पोलिसांनी गुन्हा नोंदवत आणि तपासही सुरू केला. पुढे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.