बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या ३४व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतल्याने सर्वजण दु:खी झाले आहेत. पण सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलं नाही. सध्या सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतायेत. अशातच १४ जून रोजी सकाळी सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी काही ट्विट केल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या या कथित ट्विटसचे काही स्क्रीनशॉर्टही व्हायरल झाले आहेत.
सुशांतने तीन ट्विट केले असल्याचे म्हटले जाते. त्यातील पहिले ट्विट ‘पुरुषांना त्यांच्या आरोग्याविषयी, मानसिक स्वास्थ, विचारांविषयी कधीही विचारले जात नाही. मी या सर्व गोष्टींमधून गेलो आहे. आता मी प्रयत्न करुन दमलो आहे. मी तुमच्यासोबत खूप मोठा प्रवास केला. मला नाही माहित मी ट्विट का करत आहे अशा आशायाचे असल्याचे म्हटले जाते.
त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये मी हे ट्विट काही वेळातच डिलिट करत आहे. त्यामुळे तुमच्यामधील काही लोकांना माझा संघर्ष कळेल असा आशय आहे.
मी हे सर्व चांगल्यासाठी करत आहे. कदाचित या नंतर लोकं एकमेकांचा विचार करण्यापेक्षा एकमेकांशी बोलतील अशा अशयाचे तिसरे ट्विट त्याने केल्याचे म्हटले जाते.
हे ट्विट खरे आहेत की खोटे?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सुशांतचे हे ट्विट खरे आहेत की खोटे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘इंडिया.कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या टीमने हे ट्विट फेक असल्याचे म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.