scorecardresearch

“क्रांती रेडकरच्या वेळेस गप्प बसलेले सो कॉल्ड कलाकार विक्रम गोखलेंवर…”; मराठी अभिनेत्याचा टोला

मराठी कलाकार समीर वानखेडेंवर आरोप होताना बाजू मांडणाऱ्या क्रांती रेडकरच्या प्रकरणात पाठिंब्यासाठी समोर आले नाही, असं या अभिनेत्याने म्हटलंय.

“क्रांती रेडकरच्या वेळेस गप्प बसलेले सो कॉल्ड कलाकार विक्रम गोखलेंवर…”; मराठी अभिनेत्याचा टोला
विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मनोरंजन सृष्टीमध्येच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, अशा आशयाचे विधान के ले होते. कंगनाच्या या विधानावरून देशभर वादंग माजला असताना विक्रम गोखले यांनीही पुण्यात झालेल्या समारंभात कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे, असे सांगत तिला समर्थन दिले. मात्र गोखले यांच्या या वक्तव्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाच दुसरीकडे त्यांच्या पाठिंबा देण्यासाठीही काही कलाकार पुढे येत आहेत. अशाच प्रकारची एक प्रतिक्रिया अभिनेता आरोह वेलणकरने दिली आहे. त्याने विक्रम गोखले आणि क्रांती रेडकर प्रकरणाचा संदर्भ जोडत गोखलेंवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्याशी जोडला जातोय अतुल कुलकर्णीच्या ‘या’ पोस्टचा संबंध; म्हणाला, “ज्येष्ठता आणि…”

“क्रांती रेडकरच्या वेळेस गप्प बसलेले सो कॅाल्ड कलाकार सगळे विक्रम गोखलेंवर टिका करायला आले. त्या वेळेस घाबरले होते बहुतेक,” असं आरोहने ट्विटवरुन म्हटलं आहे. यामधून त्याने समीर वानखेडेवर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केले तेव्हा समीर यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकरने त्यांची बाजू मांडली. मात्र क्रांती रेडकरला पाठिंबा देण्यासाठी कोणताही मराठी कलाकार पुढे आला नव्हता असं आरोहने अधोरेखित केलं आहे.

आरोह वेलणकरने यापूर्वीही थेट ट्विटरवरुन क्रांती रेडकरला पाठिंबा दिला होता. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर क्रांतीने समीर यांच्यासोबतच्या विवाहचे फोटो पोस्ट केले होते. हेच ट्विट रिट्विट करुन आरोहने तिला पाठिंबा दर्शवला होता. “क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.” असं म्हणत आरोहने क्रांतीला जाहीर पाठिंबा दिला. क्रांतीला सोशल मीडियावरून पुढाकार घेत पाठिंबा देणारा आरोह पहिला मराठी अभिनेता होता.

विरोध करणाऱ्या कलाकारांचं पत्र
‘हे स्वातंत्र्य दिलेले आहे. योद्धय़ांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना फाशी दिले जाताना त्या वेळचे मोठे नेते बघत राहिले. त्यांनी या योद्धय़ांना वाचवले नाही,’ असा आरोप गोखले यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामध्ये केला. विक्रम गोखलेंसारख्या नटाकडून अशा प्रकारची बेजबाबदार विधाने अपेक्षित नसल्याची भावना कलाक्षेत्रातून व्यक्त होते आहे. गोखले यांच्यासारख्या कलाकारांनी समाजाच्या एकतेवर परिणाम करतील अशी वक्तव्ये करू नयेत. ज्या गोष्टीवरून समाजात दुही पसरली आहे, दंगली होत आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांकडून अशा प्रकारची अपरिपक्व विधाने करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत आम्ही पत्राद्वारे निषेध व्यक्त के ला आहे, अशी माहिती रंगकर्मी अरुण नाईक यांनी दिली. गोखले यांनी कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यांना दिलेला दुजोरा आणि भारतीय स्वातंत्र्याबद्दल काढलेले उद्गार यामुळे कलाक्षेत्र व्यथित झाले आहे, असेही  पत्रात म्हटले आहे. या पत्राला सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक सुभाष अवचट, नाटय़दिग्दर्शक प्रेमानंद गज्वी, अमरेंद्र धनेश्वर, ज्येष्ठ रंगकर्मीकमलाकर सोनटक्के , रामदास भटकळ, दिग्दर्शिक प्रतिमा कु लकर्णी, अच्युत वझे अशा मान्यवरांनी समर्थन दिले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

आज पत्रकार परिषद
विक्रम गोखले या प्रकरणासंदर्भात आज म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. “माझं त्या दिवशीचं भाषण तुम्ही ऐकलंय का, मी कंगना रणौतला ओळखत देखील नाही. माझी आणि तिची ओळख नाही आणि कधीच सोबत काम केलेलं नाही. माझ्याविषयी जे काही लिहून आलंय त्याचं उत्तर मी १९ तारखेला देणार आहे. त्या दिवशी मलाही कुणीही प्रश्न विचारणार नाही. कंगना जे म्हटली ते खरं आहे. प्रत्येक न्यूज चॅनल आणि पत्रकार मी पुराव्यांसह काय म्हणतोय ते ऐकतच राहील,” असं विक्रम गोखले यांनी गुरुवारी म्हटलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2021 at 07:46 IST

संबंधित बातम्या