जगातील क्लिष्ट विषयांपैकी एक विषय म्हणजे प्रेम. या विषयाला अनुसरून बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता-अभिनेता करण जोहर हा त्याचा आगामी ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपट घेऊन येत आहे. प्रेम, वासना यांनी परिपूर्ण असलेले आणि नाव देण्यास कठीण झालेले नाते अशा काहीशा पार्श्वभूमीवर आधारित ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल ‘बुल्लेया’ असे असून हे एक सुफी गाणे आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. लग्नानंतर एका पठरीतीलच भूमिका करणा-या ऐश्वर्याने तिची चौकट तोडल्याचे या गाण्यात दिसून येते. तसेच यात रणबीर आणि ऐश्वर्यामधील जुळून आलेली केमिस्ट्रीही पाहावयास मिळते.
डोळ्यात पाणी आलेल्या अनुष्का शर्मा आणि फवाद खानची झलक ही गाण्यात पाहावयास मिळते. पण ऐश्वर्या आणि रणबीरने या गाण्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ‘मै किसी की जरुरत नही, ख्वाहिश बनना चाहती हूँ’ असे ऐश्वर्या रणबीरला या गाण्यात बोलताना दिसते. हे डायलॉग प्रेमात आकंत बुडालेल्या प्रेमीयुगुलांना तरी नक्कीच भावणारे असे आहेत. ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातील हे सुफी गाणे करण जोहरचे आवडते गाणे आहे. अमिताभ भट्टाचार्यने लिहलेल्या या गाण्यास संगीत दिग्दर्शक प्रितम याने संगीतबद्ध केले आहे. वारंवार ऐकावयास भाग पाडणारे बुल्लेया गाणे गायक अमित मिश्राने गायलय. याआधी आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ गाण्याने लोकांची मने जिंकली होती. त्यानंतर या चित्रपटातील गाण्यांकडून अधिकच अपेक्षा वाढल्या होत्या. बुल्लेया गाण्याने त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या आहेत असे म्हणावयास हरकत नाही. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने हे गाणे ट्विट केले आहे. ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपट येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

https://twitter.com/karanjohar/status/776655091591970816