छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अंकिता सध्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मानव ही भूमिका आता शाहीर शेख साकारत आहे. पहिल्या पर्वात अंकिता आणि सुशांतची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या व्यतिरिक्त तिने चित्रपटातही काम केले आहे. अंकिताच्या प्रोफेशनल लाइफ प्रमाणेच तिच्या खासगी आयुष्याबद्दल फॅन्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अंकिता लवकरच तिचा बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्न करणार आहे अशी बातमी समोर येत आहे. त्यामुळे आता चाहते या खास क्षणाची आतुरतेने वाटत बघत आहेत.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड विकी जैनने तिला मानसिक पाठिंबा दिला होता. येत्या काळात अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकणार आहेत अशी कुणकुण चाहत्यांना लागली आहे. तशी तयारी देखील सुरू झाली आहे असे दिसते आहे. अंकिताने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. या फोटोत अंकिताच्या घराचे काम सुरू असल्याचे दिसून आले. या घरात ती एक नवीन सुरूवात करणार आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंमुळे आता लवकरच विकी जैन सोबत विवाहबंधनात अडकणार आहे या चर्चांना आणखीन वाव मिळाला आहे. त्यामुळे आता घराच्या शुभेच्छा देण्यासोबतच लग्नाची तारीख कधी जाहीर करणार? असे प्रश्न चाहते अंकिताला विचारताना दिसले.
अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैन सोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला होता या व्हिडीओवर विकीच्या कमेंटने नेटकऱ्यांचे लक्षवेधून घेतले होते. विकीने ‘भाड़ में गया प्यार-व्यार…’, अशी कमेंट केली होती ज्यामुळे अंकिता आणि विकी जैनचा ब्रेकअप झाला आहे असे त्यांच्या चाहत्यांना वाटले होते. काही दिवसांपूर्वी अंकिताने विकी जैनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने विकीला सगळ्यात चांगला बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले होते.