Avadhoot Gupte Poem After Sonu Nigam Apologized : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या बंगळुरुमधील कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने सोनूकडे कन्नड गाणं गाण्याची मागणी केली. यावर सोनू निगमने त्या व्यक्तीच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केली. या व्यक्तव्यामुळे सोनूच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हा वाद वाढल्याने सोनू निगमने अखेर माफी मागितली आहे. “सॉरी कर्नाटक! तुमच्या लोकांवरील माझे प्रेम हे माझ्या अहंकारापेक्षा खूप मोठे आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो” असं म्हणत त्याने सोशल मिडिया पोस्ट शेअर केली.
सोनू निगमकडे चाहत्याने जी मागणी केली होती, त्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी गायकाच्या असंवेदनशील वागण्याबद्दल आक्षेप घेतला होता. कर्नाटक रक्षण वेदिके (केआरव्ही) या प्रमुख कन्नड संघटनेने बेंगळुरूमध्ये पोलिसांत सोनू विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र आता प्रकरणी सोनूने सर्वांची माफी मागितली आहे आणि हा वाद संपवला आहे. सोनूने माफी मागितल्यानंतर आता मराठी गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. अवधूतने सोनूबरोबरच्या फोटोसह या वादावर एक कविता शेअर केली आहे.
अवधूत गुप्तेची ही कविता अशी आहे की…
“वा कानड्यांनो! काय करता राव?
तुम्ही बापाला ‘सॉरी‘ म्हणायला लावता राव?
पहिलंच मान्य करतो. बाप असेल चुकला.
इमोशनल होऊन जरा जास्तच बोलला.
पण मस्ती तुम्ही पोरांनीच केली होती ना?
तो रंगात येत असता उगा कळं काढली होती ना?
मग दिल्या ठेवून दोन त्यानं… काय बिघडलं?
तुम्ही थेट पोलिसात जाऊन सांगणार की ‘काय काय घडलं?‘
बाप चिडला की कधीतरी बोलतो काही बाही…
पण मग त्यांनं पहलगाम काढायचं की गुरुग्राम, हे ‘तुम्ही‘ सांगायचं नाही!
अरे भिमाण्णांपासून शुभा मुदगलांपर्यंत सगळे तुमच्या भूमीतून आले..
त्यांना कुणी भाषेवरुन कधी कुठे अडवले?
भैरप्पांची लेखणी – सरस्वतीचं दुसरं नाव…
का उगा त्याची अशी लाज काढता राव?
अरे गायक सम्राट असतो त्याच्या मैफिलीचा…
त्याला फरक पडत नसतो भाषा-शैलीचा!
त्याला तेव्हा जे हवं ते त्याला गाऊ द्यावं…
जमेल तेवढं ओंजळीत घ्यावं… बाकी जाऊ द्यावं!
कलाकार म्हणजे इंद्राच्या दरबारातील शापित गंधर्व…
त्याला तू विकत घेऊ शकत नाहीस!
जात-धर्म-भाषांच्या तुझ्या कक्षांत…
कुठलाच कलाकार कधीच बसत नाही!
लक्षात ठेव…
अस्वल नाही तो, जरी पैसे देऊन आणलास..
आणि त्याच्या मर्जीने तो अस्वल झाला
म्हणजे तू मदारी नाही झालास!
बापाचं नाव सोनू आहे तरी
तो बाई नाही..
सोन्याचा गळा आहे…
हाती कथलाचा वाळा नाही!
भाषेचा अभिमान मलाही आहे…
म्हणून मातृभाषेतच सांगतोय…
भाषांतर तू करून घे…
पटला विचार तर बरंय, नाहीतर (डोसक्यात) घालून घे!
बाकी… मी बापाला सांगणार आहे..
खूप त्रास झाला तर महाराष्ट्रात ये..
पुढचा कार्यक्रम बंगळुरात कशाला?
आपल्या बेळगांवात घे
अवधूतची ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तसंच त्याच्या या खास कवितेचं चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकही केलं आहे. “दादा बोलतो ते रोखठोक”, “वाह क्या बात है”, “खुपते तिथे गुप्ते” अशा अनेक कमेंट्स करत त्यांनी अवधूतचं या कवितेबद्दल कौतुक केलं आहे. तर या कवितेवर स्वत: सोनूनेदेखील कमेंट केली आहे. “खूप खूप प्रेम. देव सर्वांना आशीर्वाद देवो.” असं म्हणत सोनूने अवधूतच्या कवितेला प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, सोनू निगमच्या गायनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आजवर एकूण ३२ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात हिंदीव्यतिरिक्त कन्नड, बंगाली, मराठी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, आसामी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाळी, तुळु, आणि मणिपुरी आदी भाषांचा समावेश आहे. तसंच सोनूने अवधूतसाठी काही गाणी गायली आहेत.