‘मिस हवाहवाई’ म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिवेत्री श्रीदेवीच्या चाहत्यांमध्ये आजही घट झालेली नाही. सौंदर्य आणि अदा यांचे सुरेख समीकरण असणारी श्रीदेवी म्हणजे न मांडता येणारी एक संज्ञा. अशा या अभिनेत्रीच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्याविषयीची बऱ्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

बऱ्याच अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या श्रीदेवीची प्रेमप्रकरणंही चर्चेचा विषय ठरली होती. त्यातही विशेष चर्चा रंगली ती म्हणजे जीतेंद्र आणि श्रीदेवीच्या जोडीची. ‘हिम्मतवाला’, ‘जानी दोस्त’ आणि ‘जस्टिस चौधरी’ अशा चित्रपटांमध्ये या दोघांनीही स्क्रीन शेअर केली. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि चित्रपटसृष्टीत उठणारे अफवांचे वादळ पाहता त्यांच्या नात्याविषयी बरेच तर्क लावले जाऊ लागले. पण, १९८४ मध्ये एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवीने सर्व गोष्टी स्पष्ट करत या अफवांचे वादळ शमवण्याचा प्रयत्न केला आणि आपण कधीच विवाहीत पुरुषाशी लग्न करणार नसल्याचे सांगितले.

त्याच मुलाखतीतीत काही भाग ‘पिंकव्हिला’ या वेबसाइटने प्रसिद्ध केला. कलाकारांच्या काही जुन्या मुलाखती नेहमीच चर्चेत असतात. श्रीदेवीची ही मुलाखतही त्यापैकीच एक म्हणायला हरकत नाही. अभिनेते जीतेंद्र यांच्यासोबत नाव जोडलं जाण्याविषयी श्रीदेवीला विचारं असता त्यावेळी ती म्हणाली होती, ‘ते व्यक्ती म्हणून खूपच चांगले आहेत. चित्रपटाच्या सेटवरील पहिला दिवस मी कधीच विसरु शकत नाही. कारण, त्यावेळी त्यांनी मला फार मदत केली होती. हिंदी भाषेबद्दल माझ्या मनात फार न्यूनगंड होता. कारण ‘सोलवाँ सावन’ हा माझा पहिलाच चित्रपट अपयशी ठरला होता. पण, जीतूजींनी माझा आत्मविश्वास वाढवला, चित्रपटातील संवाद समजावून सांगत त्यांनी मला फारच मदत केली. त्यांचा हाच स्वभाव मला खूप भावला होता.’ जीतेंद्र यांच्याविषयी सांगताना श्रीदेवीने बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

चित्रीकरणावेळी हे दोन्ही कलाकार एकाच खोलीच राहत असल्याच्याही चर्चांना त्या काळात उधाण आले होते. त्याविषयी सांगताना श्रीदेवीने स्पष्ट केले की, ‘मी आणि जीतूजी कधीच एका खोलीत राहिलो नाही. इतकंच काय, तर आम्ही दोघं कधी एकमेकांच्या खोलीतही गेलो नाही. मला माहितीये की आमच्याविषयी बऱ्याच वाईट गोष्टीही बोलल्या गेल्या. पण, त्याकडे मी दुर्लक्ष केले.’

जीतेंद्र यांच्यासोबत नाव जोडले गेल्यामुळे श्रीदेवीच्या कुटुंबावरही त्याचा बराच परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्या मुलाखतीत खुद्द श्रीदेवीनेच ही बाब उघड केली. त्याशिवाय आपण विवाहीत पुरुषाशी कधीच लग्न करणार नाही, हेसुद्धा तिने ठामपणे सांगितले होते. ‘दक्षिण भारतात दुसरे लग्न, दुसरी पत्नी याविषयी बरीच चर्चा होते. त्याविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळेच मी कधीच विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही’, असे श्रीदेवी म्हणाली होती. श्रीदेवी आणि जीतेंद्रचे नाते तिथेच थांबले. पण, पुढे जाऊन याच अभिनेत्रीने विवाहित पुरुषाशी लग्नगाठ बांधत अनेकांनाच धक्का दिला.