आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या २० जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिर खानने तो दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं आहे.
लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ या आगामी चित्रपटात आमिर खान झळकणार आहे. रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये आमिर खानसुद्धा पाहायला मिळणार आहे. आमिरने त्याला जेव्हा रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात काम करणार का असं विचारलं, तेव्हा त्याने चित्रपटाची कथा न ऐकताच होकार दिल्याचं म्हटलं आहे. ‘झूम’शी संवाद साधताना त्याने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आमिर म्हणाला, “मला या चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली. मी रजनीकांत यांचा खूप मोठा चाहता आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्यांचा खूप आदर करतो, त्यामुळे जेव्हा मला लोकेशने यासाठी विचारलं, तेव्हा मी लगेच होकार दिला.”
‘कुली’ चित्रपटाबद्दल बोलताना आमिर खान पुढे म्हणाला, “जेव्हा मला लोकेश म्हणाला की रजनीकांत सरांचा चित्रपट आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की मी या चित्रपटात काम करावं; तेव्हा मी चित्रपटाची कथा काय आहे हे जाणून न घेताच चित्रपटासाठी होकार दिला होता. मी म्हणालो मला चालेल, मी या चित्रपटात काम करत आहे. कथा काहीही असो मी यामध्ये काम करतोय.”
रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रजनीकांत यांच्यासह अभिनेते नागार्जुन, श्रुती हासन, पूजा हेगडे, उपेंद्र आणि आमिर खान यांसारखे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटातून आमिर खान व रजनीकांत तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी ते ‘आतंक ही आतंक’ या दिलीप शंकर यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात झळकले होते. यासह ‘कुली’ या चित्रपटातून आमिर खान व लोकेश कनागराज पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.