Aamir Khan Talk About His Divorce Struggle : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असतो. अभिनेता स्वत:च अनेकदा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगतो. आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. याच चित्रपटच्या निमित्ताने आमिर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच एका मुलाखतीत अभिनेत्याने रीना दत्ताबरोबरच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे.
आमिरने १८ एप्रिल १९८६ रोजी रीना दत्ताबरोबर लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. या घटस्फोटाचा आमिरला प्रचंड त्रास झाला होता आणि या त्रासात त्याने दारू पिण्यास सुरुवात केली होती. तसंच यामुळे त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही येत असल्याचे त्याने सांगितलं.
याबद्दल ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “रीना आणि मी १६ वर्षे एकत्र होतो. जेव्हा मी आणि रीना वेगळे झालो; ती रात्र माझ्यासाठी खूप कठीण होती. कारण घरात तेव्हा कोणीच नव्हते. तिने स्वयंपाकीला तिच्याबरोबर नेलं होतं आणि मी माझ्या ड्रायव्हरला तिच्याबरोबर पाठवलं होतं. कारण तो खूप विश्वासातला होता. त्यामुळे तो रीना आणि मुलांबरोबर राहावा असं मला वाटत होतं. तर तेव्हा मी पूर्णपणे एकटा होतो. मी खूप दुःखी होतो. मला काहीच समजत नव्हतं.”
यापुढे आमिर म्हणाला, “मी कामासाठी एक-दोनदा दारू प्यायलो होतो. ‘राजा हिंदुस्तानी’मध्ये एक सीन होता, ‘अकेले हम अकेले तुम’मध्ये एक सीन होता, त्यात मला दारू पिणाऱ्याची भूमिका करावी लागली. ते कसं करावं हे मला समजत नव्हतं. त्यामुळे मी विचार केला की, जर मी प्रत्यक्षात दारू पिल्यानंतर तो सीन केला तर ते माझ्यासाठी सोपं होईल. मी दोनदा दारू प्यायलो होतो. मी मित्रांसाठी घरी दारू ठेवली होती. म्हणून जेव्हा घरी कोणी नव्हते, मला एकटेपणा जाणवत होता आणि मला तेव्हा काय करावे हे कळत नव्हतं. त्यादिवशी मी बाटली घेतली आणि त्यातली सगळी दारू प्यायलो.”
यानंतर आमिर खान भावुक होत म्हणाला, “पुढचे दीड वर्ष मी रोज दारू प्यायल्याशिवाय रात्री झोपत नसे आणि बेशुद्ध पडायचो. तो काळ खूप कठीण होता. तेव्हा मी सुमारे २-३ वर्षे कामही केलं नाही. त्याचवर्षी जूनमध्ये ‘लगान’ प्रदर्शित झाला आणि वर्षाच्या अखेरीस आमचं ब्रेकअप झालं होतं. ‘लगान’ खूप चालला, ‘दिल चाहता है’ यशस्वी झाला. त्यामुळे तेव्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वर्षअखेरच्या वृत्तपत्रात जो १ जानेवारीला येतो, त्यात ‘मॅन ऑफ द इयर आमिर खान’ असं शीर्षक असलेली बातमी आली होती आणि ‘मॅन ऑफ द इयर’ वाचून मला खूप विचित्र वाटलं, कारण तेव्हा माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते आणि वर्तमानपत्रात लिहिलेलं होतं ‘मॅन ऑफ द इयर'”.
यापुढे त्याने सांगितलं, “मी दीड-एकवर्ष देवदास म्हणून फिरत होतो. देवदासप्रमाणेच मीसुद्धा आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. तेव्हा मला माझ्या आरोग्याची अजिबात पर्वा नव्हती. मी तेव्हा काहीच कामही करत नव्हतो किंवा कोणालाच भेटतही नव्हतो. मी फक्त एकटाच घरीच असायचो. त्या काळात माझे काही एक-दोन मित्र असतील, ज्यांना मी भेटायचो.”