‘अपना सपना मनी मनी’, ‘योद्धा’, ‘क्या कूल है हम’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालं आहे. ८ मे ( बुधवार ) रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिवन यांच्या निधनावर सिनेविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ते बॉलीवूड स्टार्स सनी देओल, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे यांनी सिवन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिग्दर्शकाच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संगीत सिवन यांचे धाकटे बंधू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमेटोग्राफर संतोष सिवन यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सर्वांना दिली. याशिवाय रितेश देशमुखने सुद्धा एक्स पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : ‘तू भेटशी नव्याने’ : सुबोध भावेची नवीन मालिका! शिवानी सोनारसह साकारणार प्रमुख भूमिका, जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

रितेश देशमुखची एक्स पोस्ट

अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखने सिवन यांच्याबरोबर ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी-मनी’मध्ये काम केलं होतं. अभिनेता लिहितो, “संगीत सिवन सर…आज आपल्यात नाहीत हे ऐकून खूप दु:ख झालं. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत नवीन असता, तेव्हा खूप कमी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणारी आणि तुम्हाला संधी देणारी असतात. ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’साठी मी त्यांचा कायम आभारी आहे. ते अत्यंत मृदुभाषी, नम्र आणि अद्भुत व्यक्ती होते. आज ही बातमी ऐकून मला खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंब आणि प्रियजन, त्यांची पत्नी, मुलं, भाऊ यांच्या दु:खात मी सहभागी आहे. दा…तुमची आठवण कायम येत राहील. रेस्ट इन ग्लोरी” रितेशप्रमाणे अभिनेता श्रेयस तळपदे, सनी देओल यांनी देखील सिवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवीन मालिका! तब्बल ९ वर्षांनी शिवानी सुर्वेचं पुनरागमन, तारीख अन् वेळ केली जाहीर

सनी देओल एक्स पोस्ट

संगीत सिवन यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘राख’ या चित्रपटापासून केली होती. ज्यामध्ये आमिर खान आणि पंकज कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात त्याने निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर सनी देओलच्या ‘झोर’ चित्रपटाद्वारे त्यांनी कलाविश्वात दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.