Faissal Khan on Aamir Khan’s Ex wife Reena Dutta and Kiran Rao: बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो.
काही दिवसांपूर्वीच तो ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाबरोबरच गौरी स्पॅटबरोबरच्या नात्याबद्दलदेखील त्याने खुलासा केल्याने तो मोठ्या चर्चेत होता. रीना दत्ता व किरण राव यांच्याबरोबरचे लग्न व घटस्फोट आणि आता दोघींबरोबर असलेले मैत्रीपूर्ण संबंध यांमुळे हे कुटुंब सातत्याने लक्ष वेधून घेते.
आता आमिर खानचा लहान भाऊ फैसल खानने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आमिर खान व रीना दत्ता यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले. तसेच आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचेदेखील त्याने म्हटले. याबरोबरच आमिर आणि किरण राव यांच्या नात्याबद्दलही वसूल केला.
“मी आमिरच्या खूप जवळचा…”
आमिर खानबरोबर कसे नाते आहे? यावर फैसल खान म्हणाला, “मी आमिरच्या खूप जवळचा होतो. असाही एक काळ होता, जेव्हा आमिरने रीनाबरोबर लग्न केले होते, तेव्हा कुटुंबातील मी असा एकटा होतो, ज्याला त्याच्या लग्नाबद्दल माहीत होते. मला स्किझोफ्रेनियाचे निदान झाल्यानंतर एक वर्ष जेव्हा मला मुंबईच्या घरात बंद करून ठेवले होते, तेव्हादेखील तो माझी काळजी घ्यायचा.”
“रीनाबरोबर माझे नाते कायमच चांगले होते”
रीना दत्तबरोबरच्या नात्याबाबत तो असेही म्हणाला, “रीनाबरोबर माझे नाते कायमच चांगले होते. ती माझ्याशी कायमच चांगली वागत असे. ती खूप प्रेमळ आहे. आमिर आणि रीनाचे नाते तुटले ही दु:खाची गोष्ट आहे. ज्यावेळी रीना आमिरच्या आयुष्यात आली, तेव्हा आमिर खान कोणीच नव्हता. आमिर खान मोठा अभिनेता वगैरे आहे. त्यामुळे तिने त्याच्याबरोबर लग्न केले, असे नाही. कारण- आमिरचे करिअर त्यावेळी तितके चांगले नव्हते. त्यांचे प्रेम निर्मळ होते. रीना खूप संवेदनशील व्यक्ती आहे. मला कायमच तिच्याबद्दल आदर वाटतो.”
किरण रावबद्दल फैसल खान काय म्हणाला?
किरण रावबद्दल फैसल खान म्हणाला, “मी तिच्याबरोबर कधीही बोललो नाही. त्यामुळे मला तिच्याबद्दल खूप काही माहीत नाही. तिच्याबद्दल काही कमेंट्स करण्यासाठी मी तिच्याबद्दल इतके जाणत नाही. तीसुद्धा माझ्याबद्दल फार काही जाणत नाही. आमच्यात संवाद होण्याची कधी वेळच आली नाही. २००५ मध्ये लग्नाच्या दोन वर्षे आधी ती आमिर खानबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. ते दोघे त्यांच्या कामात व्यग्र होते आणि त्या काळात मी घरात बंद होतो. माझा स्वत:चा एक संघर्ष सुरू होता. तिला जाणून घेण्यासाठी वेळ नव्हता.”
दरम्यान, याच मुलाखतीत फैसलने त्याला स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याने त्याला मुंबईतील त्याच्या घरी एक वर्षासाठी ‘कैद’ ठेवल्याचे वक्तव्यदेखील केले. यावर आमिरच्या कुटुंबाने यावर स्पष्टीकरण देताना फैसलने गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्याचे म्हटले आहे.