Farah Khan On Kajol: काजोल ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अनेक चित्रपटांतील भूमिकांची आजही चर्चा होताना दिसते. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेखुदी’ या चित्रपटातून अभिनेत्रीने पदार्पण केले. मात्र, १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ या चित्रपटातून काजोलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शाहरुख खान काजोल यांची ऑनस्क्रीन जोडी हिट ठरली होती. त्या दोघांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. आजही या चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता फराह खानने काजोलबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

फराह खान काय म्हणाली?

फराह खान तिच्या कूकबरोबर अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घरी भेट देते. त्याचे व्हिडीओ ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करते. या व्हिडीओमध्ये ती सेटवरील अनेक किस्से गमतीजमती सांगते. आता फराह खान नुकतीच सान्या मल्होत्राच्या घरी तिचा कूक दिलीपसह गेली होती. यावेळी सान्या, दिलीप व फराह या तिघांनी मिळून जेवण बनवले.

सान्याच्या डाव्या पायावर दुखापतीचे निशाण झाल्याचे फराहला दिसले. कारण विचारले असता सान्याने सांगितले की, विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या बाईकचा अपघात झाला होता. या चित्रपटात राधिका मदानदेखील प्रमुख भूमिकेत होती. यावेळी फराह खानने सांगितले, ज्या सेटवर प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री पडतात ते चित्रपट हिट ठरतात.

पुढे फराह खानने चित्रपटांचे किस्सेदेखील सांगितले. फराह खान म्हणाली, ज्या चित्रपटात काजोल प्रमुख भूमिकेत असायची, त्या चित्रपटांचे शूटिंग करताना ती पडायची. काही काळानंतर आमच्या असे लक्षात आले की जेव्हा काजोल एखाद्या चित्रपटाच्या सेटवर पडते तेव्हा ते चित्रपट हिट ठरतात. मग काही काळानंतर जेव्हा जेव्हा काजोल पडायची तेव्हा आम्ही चित्रपट हिट होईल या आशेने सुटकेचा निश्वास टाकायचो.

फराह खानने प्रीती झिंटाचादेखील किस्सा सांगितला. २००३ साली ‘कल हो ना हो’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी प्रीती झिंटा पुलावर शूटिंग करत होती, त्यावेळी ती खाली पडली. आम्ही विचार केला की बरं झालं ती पडली, आता चित्रपट हिट ठरणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फराह गमतीने असेही म्हणाली की, असे अनुभव आल्याने आता कधीकधी माझ्या कलाकरांना ढकलत असते. फराह खानने कल हो ना हो, कुछ कुछ होता है या दोन्ही चित्रपटांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. दरम्यान, फराह खान तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते.