Housefull 5 First Song Laal Pari: साजिद नाडियाडवालाच्या ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अर्जुन रामपाल स्टारर या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून आतापर्यंत याचे चार भाग आले आहेत. त्यानंतर सहा वर्षांनी ‘हाऊसफुल ५’ चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’चा लवकरच मोठ्या पडद्यावर धमाका होणार आहे. या चित्रपटातील पहिल्या-वहिल्या गाण्यानं सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. युट्यूबवर हे गाणं पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतं आहे.
‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचं नाव ‘लाल परी’ असं आहे, जे सध्या खूप चर्चेत आहे. काहीजण या गाण्याचं कौतुक करत आहेत. तसंच काहीजण जॅकलीन फर्नांडिसच्या डान्सचं कौतुक करत आहेत. तर काहीजण तिच्या डान्सची तुलना नोरा फतेहीशी करत आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “जॅकलीन नेहमी खूप चांगली डान्स करते. पण, आता नोरा फतेहीच्या डान्स स्टेप्स कॉपी का करत आहे?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, जॅकलीन आता कधी नोराच्या मुव्स कॉपी करणं बंद करणार नाही वाटतं. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “स्पष्टपणे दिसत आहे की, जॅकलीनने केलेल्या मुव्स नोराच्या आहेत.” चौथ्या नेटकऱ्याने मजेत लिहिलं, “मला वाटतं, जॅकलीनला नोरावर प्रेम झालं आहे.” एवढंच नाहीतर काही जणांनी दावा केला आहे की, हे गाणं नोरा फतेहीच्या गर्मी गाण्याशी मिळत-जुळत आहे.

‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील ‘लाल परी’ हे गाणं ३ मेला प्रदर्शित झालं असून आतापर्यंत युट्यूबवर या गाण्याला २ कोटी ७४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यो यो हनी सिंग आणि सिमर कौरने यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सौंदर्या शर्मा, नर्गिस फाखरी आणि सोनम बाजवा पाहायला मिळत आहेत. ‘लाल परी’ या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन रेमो डिसूझाने केलं आहे.
दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सौंदर्या शर्मा, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा यांच्या व्यतिरिक्त संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर यांसारखे अनेक तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. ६ जून २०२५ ला ‘हाऊसफुल ५’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.