Indias Richest Film Family: बॉलीवूडकडे एक मोठा उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिले जाते. दर महिन्याला कोट्यवधींचे चित्रपट तयार होतात. त्यामुळे काही निर्माते व कलाकार खूप श्रीमंत असल्याचे पाहायला मिळते.

अनेक बॉलीवूड कलाकारांची श्रीमंतांमध्ये गणना होते. त्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, जुही चावला ते अमिताभ बच्चन, रणबीर कपूर अशा अनेक कलाकारांची नावे घेतली जातात. या सगळ्यात असे एक कुटुंब आहे, जे बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब आहे. ज्या कुटुंबातील एकही व्यक्ती अभिनय क्षेत्रात नाही. विशेष बाब म्हणजे हे घराणे कपूर किंवा खान नाही. बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत असलेल्या या कुटुंबाबाबत जाणून घेऊ…

बॉलीवूडमधील ‘हे’ घराणे आहे सर्वात श्रीमंत

हुरुन रिच लिस्टनुसार टी-सिरीजचे कुमार कुटुंब हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती १० हजार कोटींहून अधिक आहे. याआधी कपूर व चोप्रा यांना बॉलीवूडमधील श्रीमंत कुटुंबे म्हणून ओळखले जात होते. यशराज फिल्म्स व बीआर फिल्म्सचे मालक असलेल्या चोप्रा कुटुंबाची एकत्रित संपत्ती आठ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सनुसार शाहरुख खानच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ७,८०० कोटी आहे. तर, कपूर कुटुंबाची संपत्ती दोन हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

चित्रपटसृष्टीतील श्रीमंत कुटुंबांमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलही काही कुटुंबांचा समावेश आहे. त्यामध्ये अल्लू कुटुंबाची वर्णी लागते, ज्यामध्ये चिरंजीवी, पवन कल्याण, राम चरण व अल्लू अर्जुन हे समाविष्ट आहेत. त्यांची संपत्ती चार हजार कोटी इतकी आहे. तसेच अक्किनेनी-दग्गुबती कुटुंब हेदेखील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. नागर्जुन, नागा चैतन्य, वेंकटेश व राणा दग्गुबती यांचा त्यात समावेश आहे. त्यांची संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूषण कुमार यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे, तर त्यांच्या संपत्तीत प्रॉडक्शन कंपनी टी-सीरिजचा मोठा वाटा आहे. भूषण कुमार ही कंपनी त्यांचे काका किशन कुमार यांच्याबरोबर सांभाळतात. भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला ही दिग्दर्शक आहे. तसेच ती अभिनय क्षेत्रात काम करतानाही दिसते. खुशाली कुमार ही भूषण कुमार यांची बहीण अभिनेत्री म्हणून, तसेच तुलसी कुमार ही गायिका म्हणून काम करताना दिसते.