Madhuri Dixit Movie : ९० चं दशक गाजवणारी सुपरस्टार अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘हम आपके हैं कौन’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘खलनायक’, ‘साजन’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये माधुरीने मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. तिने केवळ अभिनयानेच नव्हे तर आपल्या नृत्यशैलीने सुद्धा चाहत्यांना भुरळ घातली आहे. आता ‘धकधक गर्ल’चा २८ वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेला एक लोकप्रिय सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची लाट आली आहे. काही दिवसांपूर्वीच २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ ९ वर्षांनी पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि त्या सिनेमाला प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. याशिवाय ‘कहो ना प्यार है’, ‘रहेना है तेरे दिल मै’, ‘तुझे मेरी कसम’ असे अनेक सिनेमे गेल्या काही महिन्यांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आणि या सगळ्याच सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा एक सिनेमा पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहे.

माधुरी दीक्षितने या सिनेमात शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्यासह स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय माधुरी आणि करिश्माचा एक डान्स फेस ऑफ सुद्धा प्रेक्षकांना यामध्ये पाहायला मिळाला होता. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल पुन्हा प्रदर्शित होणार्‍या सिनेमाचं नाव आहे ‘दिल तो पागल हैं’. हा सिनेमा ३१ ऑक्टोबर १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याकाळी या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर’, ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ आणि ‘लोकप्रिय चित्रपट’ असे ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि तब्बल ८ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. आता २८ वर्षांनी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘यशराज फिल्म्स’ने अधिकृत पोस्ट शेअर करत ‘दिल तो पागल हैं’ येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार, अशी माहिती दिली आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, शाहरुख खान, करिश्मा कपूर, अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. असंख्य नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत सिनेमा पाहण्यासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे.