Naseeruddin Shah Shared A Post : लोकप्रिय गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ हा सध्या त्याच्या ‘सरदारजी ३’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात त्याच्यासह पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याने हा वाद निर्माण झाला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर देशात बंदी आणली, पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी असतानाही हानियाची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित केला जात आहे, यामुळे प्रेक्षकांनी दिलजीतवर टीका केली.
‘सरदारजी ३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून अनेकांनी अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. अशातच प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. नसीरुद्दीन शाह म्हणाले, “माझा दिलजीतला पाठिंबा आहे. जुमला पार्टी घाणेरडे आरोप करून दिलजीतवर निशाणा साधत आहेत. त्यांना असं वाटतंय, त्यांना जे हवंय ते साध्य होणार आहे.”
पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, “चित्रपटाच्या कास्टिंगचा निर्णय हा त्याचा नव्हता, हा निर्णय दिग्दर्शकाचा आहे. पण, कोणालाही याबाबत माहिती नाही आणि सगळ्यांनी दिलजीतला ट्रोल केलं. परंतु, त्याने चित्रपटासाठी ज्या कलाकारांची निवड करण्यात आली त्यांच्याबरोबर कलाकार समजून काम केलं एवढंच. या लोकांना भारत-पाकिस्तानमधील लोकांमध्ये वाद निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानमध्ये माझे काही नातेवाईक आणि मित्र राहतात आणि त्यांना भेटण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही.”

‘गल्फ न्यूज’च्या माहितीनुसार ‘सरदारजी ३’ चित्रपटाची पाकिस्तानमध्ये विक्रमी सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५०० डॉलर्स इतकी कमाई केली, तर आजवर पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेल्या इतर सर्व भारतीय चित्रपटांच्या तुलनेत ‘सरदारजी ३’ चित्रपटाने अधिक कमाई केली आहे.
दरम्यान, ‘बीबीसी एशियन नेटवर्क’शी संवाद साधताना दिलजीतने त्याची प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, “पहलगाम हल्ल्याआधी या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, ज्या आमच्या नियंत्रणात नव्हत्या. निर्मात्यांनी चित्रपटात मोठी गुंतवणूक केल्याने हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने त्यांचं खूप नुकसान होणार होतं, त्यामुळे निर्मात्यांनी भारतात चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही मग भारताबाहेर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.