Naseeruddin Shah deletes post supporting Diljit Dosanjh : बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अनेकदा सामाजिक घडामोडींवरील त्यांची मतं मांडत असतात. बऱ्याचदा ते सोशल मीडियाचा यासाठी वापर करतात. नुकताच त्यांनी सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला लोकप्रिय अभिनेता दिलजीत दोसांझ याला पाठिंबा दिला होता. परंतु, त्यामुळे नसीरुद्दीन शाह यांना स्वत:लाच त्यांनी दिलजीतला दिलेल्या पाठिंब्यामुळे मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं
दिलजीत दोसांझचा पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची भूमिका असलेला ‘सरदराजी ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असल्यानं हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करता, तो पाकिस्तानसह इतर देशांत प्रदर्शित करण्यात आला. हा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांचा होता, असं दिलजीतनं माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं. परंतु, पहलगाम हल्ल्यानंतरसुद्धा पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटात काम केल्यानं आणि तो चित्रपट प्रदर्शित केल्यानं त्याला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.
दिलजीतवर होत असलेल्या टीकेनंतर नसीरुद्दीन शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत त्याला पाठिंबा दिला आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली. पण, आता त्यांनी ती पोस्ट डिलीट केली असून, एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ते नवीन पोस्ट शेअर करीत म्हणाले, “जेव्हा सगळे एखाद्या व्यक्तीला समजून न घेता, त्याच्यावर निशाणा साधतात तेव्हा तिथे सत्याच्या बाजूनं बोलणं किंवा आपली बाजू मांडणं अशक्य असतं”. – जॉर्ज क्रिस्टोफ लिक्टेनबर्ग, शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

नसीरुद्दीन यांच्या पोस्टवर अनेकांच्या समिश्र प्रतिक्रिया आलेल्या दिसतात. काहींनी त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं म्हणत कमेंट्स केल्या होत्या. तर काहींनी ते दिलजीतला पाठिंबा देत असल्यामुळे ट्रोल केलं. दरम्यान, यापूर्वी त्यांनी पोस्ट केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हटलं होतं, “माझा दिलजीतला पाठिंबा आहे. जुमला पार्टी घाणेरडे आरोप करून दिलजीतवर निशाणा साधत आहेत; पण चित्रपटाच्या कास्टिंगचा निर्णय हा त्याचा नव्हताच”.
नसीरुद्दीन पुढे म्हणाले होते, “चित्रपटासाठी कोणत्या कलाकारांची निवड करायची हा निर्णय दिग्दर्शकाचा होता. पण तो कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. सगळे दिलजीतवर टीका करीत आहेत. त्यानं फक्त चित्रपटासाठी निवड झालेल्या कलाकारांसह काम केलं आहे; काही वाईट केलेलं नाही. या लोकांना भारत-पाकिस्तानमधील लोकांमध्ये वाद निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानमध्ये माझे काही नातेवाईक व मित्र राहतात आणि त्यांना भेटण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही”.
नसीरुद्दीन यांनी एक्स व फेसबुकवर पोस्ट करीत त्यांची प्रतिक्रिया दिली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. नसीरुद्दीन यांनी सोमवारी (३० जून) ही पोस्ट शेअर केली होती; मात्र आता त्यांनी ती पोस्ट डिलीट केल्याचं पाहायला मिळतं.