शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस झाले आहेत. पण आता प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद फारच कमी झालेला दिसतोय. या चित्रपटाने १५व्या दिवशी किती कमाई केली हा आकडा आता समोर आला आहे.
‘पठाण’ हा चित्रपट जगभरात दमदार कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. तर बारा दिवसात या चित्रपटाने भारतातून ४०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातून त्याने आतापर्यंत ८०० हून अधिक कोटी कमावले आहेत. कमाईच्या बाबतीत अनेक बड्या बॉलिवूड चित्रपटांनाही याने मागे टाकलं आहे. पण फार कमी दिवसात या चित्रपटाची प्रेक्षकांच्या मनात असलेली क्रेझ कमी होताना दिसतेय.
या चित्रपटाने १४ व्या दिवशी ७.८० कोटींची कमाई केली होती. पण काल म्हणजेच प्रदर्शनाचा १५ दिवशी या चित्रपटाने भारतातून एकूण ७.०५ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत या चित्रपटाने भारतातून ४५३.२५ कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत जगभरातून या चित्रपटाने ८७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची दुसऱ्या आठवड्याची कमाई ही पहिल्या आठवड्याच्या मानाने खूप कमी आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पुढील काही दिवसात किती कमाई करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. शाहरुख बरोबरच या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.