Salman Khan Heat And Run Case : सलमान खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सलमान त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. अशातच नुकतंच प्रसिद्ध दिग्दर्शकानं सलमानबद्दल वक्तव्य केलं आहे.

प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक पुनीत इस्सर यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये सलमानबद्दल वक्तव्य केलंय. त्यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सलमानबरोबर काम करतानाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. ते म्हणाले, २००२ साली जेव्हा सलमान हिट अँड रन प्रकरणामुळे चर्चेत होता. तेव्हा तो कठीण परिस्थितीतून जात होता. पुनीत इस्सर व सलमान खान हे हिट अँड रन या घटनेनंतर दोन वर्षांनी ‘गर्व’ या चित्रपटासाठी एकत्र काम करीत होते.

पुनीत इस्सर सलमान खानबद्दल पुढे म्हणाले, “चित्रपटासाठी आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा तो हिट अँड रन या प्रकरणात अडकला होता. परंतु, त्यावेळी कठीण परिस्थितीतून जात असताना त्याने त्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून सर्व लक्ष कामावर केंद्रित केलं. कारण- त्यावेळी तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता; परंतु त्याच्या कुटुंबीयांनी त्याला कामाकडे लक्ष देण्यास सांगितलं”.

पुनीत इस्सर यांनी यामध्ये सलमान खानच्या वडिलांबरोबर झालेल्या संवादाबद्दलही सांगितलं आहे. ते म्हणाले, “सलमान खान त्यावेळी अस्वस्थ होता. त्यामुळे त्याला फक्त कामाकडेच लक्ष दे, असं सांगितलं होतं. त्यांनी मलाही सलमानला सांगायला सांगितलेलं की, त्याला सांग कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित कर आणि कामातच व्यग्र राहा. त्यांचा तो निर्णय मला योग्य वाटला”.

पुनीत इस्सर यांनी गर्व या चित्रपटाच्या सेटवरील सलमानच्या वागण्याबद्दल सांगितलं, “घडलेल्या प्रकारामुळे तो इतका अस्वस्थ असतानाही सेटवर येऊन व्यायाम करायचा, शूटिंग करायचा आणि त्याचं काम झालं की जायचा”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, सलमान खाननं २००२ साली मुंबईच्या वांद्रे परिसरात दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडून एका व्यक्तीचा अपघात झाला. अपघातात त्या व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला; पण त्याच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा न सापडल्यानं उच्च न्यायालयानं त्याला २०१५ साली निर्दोष सोडलं.