Shah Rukh Khan : २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या पहिल्याच चित्रपटात अनुष्का शर्माला शाहरुख खानसह स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली होती. तेव्हापासून ‘किंग खान’ची अनुष्काबरोबर खूप चांगली मैत्री आहे. या दोघांनी ‘जब तक हैं जान’, ‘झिरो’, ‘जब हॅरी मेट सेजल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

याशिवाय शाहरुख खान अनुष्काचा पती स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा नेहमीच बॉलीवूडचा जावई असा उल्लेख करतो. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ‘किंग खान’ने रुपेरी पडद्यावर विराटची भूमिका साकारण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. यावेळी अनुष्काने काय प्रतिक्रिया दिली होती पाहुयात…

२०१७ मध्ये ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनल इव्हेंट दरम्यान हा किस्सा घडला होता. शाहरुख खानला, “तुला कोणत्या क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी किंग खानने जराही वेळ घालवता विराट कोहली असं उत्तर दिलं होतं.

यावेळी शाहरुखबरोबर अनुष्का देखील उपस्थित होती. विराट कोहली हे उत्तर ऐकताच अनुष्का लगेच म्हणाली, “पण तुला दाढी वाढवावी लागेल…” यावर शाहरुख तिला म्हणाला, “मी ‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये दाढी वाढवली होती आणि तेव्हा मी अगदी विराट कोहलीसारखा दिसत होतो…” यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

याशिवाय शाहरुख खानला एकदा ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये देखील विराटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “सर, विराट कोहलीबद्दल काहीतरी सांगा कारण, दररोज आम्ही तुम्हा दोघांच्या फॅन्स क्लबमध्ये होणारी भांडणं पाहतो.”

चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला होता, “मला विराट कोहली खूप आवडतो. तो माझ्यासारखाच आहे. त्याच्या भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मी नेहमीच प्रार्थना करेन… भाऊ आपला जावई आहे.” किंग खानच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘जवान’, ‘पठाण’ या सिनेमांच्या यशानंतर किंग खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुखसह त्याची लेक सुहाना खान महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल.