शाहरुख खानच्या ‘पठाण’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण तरी सगळीकडे याचं ऍडव्हान्स बुकिंग अगदी जोरात सुरू आहे, शाहरुखचे चाहते तर त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीने कित्येकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच लोकांनी यावर टीका केली तर काही या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.

पठाण पहिल्या दिवशी ४० कोटीची कमाई करू शकतो अशी शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे. पण या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ‘पठाण’च्या टीमने त्यांची स्ट्रॅटजी बदलली असल्याचं ध्यानात आलं आहे. चित्रपट प्रदर्शनाआधी टीमपैकी कुणीही कोणत्याही मुलाखती देणार नसून मोठमोठ्या टेलिव्हिजन प्रोग्राममध्येसुद्धा कलाकारांनी हजेरी लावण्यास नकार दिला आहे.

आणखी वाचा : “तुम्ही गोडसेचाही सन्मान कराल…” राजकुमार संतोषी यांचं ‘गांधी गोडसे’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य

इतकंच नाही तर ‘बिग बॉस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’सारख्या कार्यक्रमात या चित्रपटाचं यंदा प्रमोशन होणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. खुद्द सलमान खान ‘पठाण’चा हिस्सा असूनही त्याच्या ‘बिग बॉस’च्या मंचावर यंदा शाहरुखच्या पठाणचं प्रमोशन होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय कपिल शर्माकडूनही शाहरुख खानला बरीच विचारणा झाली, पण अखेर शाहरुख खानच्या टीमने त्याच्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. एकूणच मुलाखतीमधून निर्माण होणाऱ्या वादापासून दूर राहण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिनेतज्ञ तरण आदर्श यांनीसुद्धा शाहरुखच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. कोणत्याही वादात अडकू नये यासाठी पठाणच्या निर्मात्यांनी लढवलेली ही शक्कल उत्तम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. यामध्ये शाहरुखबरोबर दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.