Shefali Jariwala Passes Away : शेफाली जरीवालाच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. शेफालीच्या निधनानंतर सोशल मीडियावर तिचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शेफाली २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटा लगा’ गाण्यामुळे सर्वत्र चर्चेत आली होती. या म्युझिक व्हिडीओमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. “तुला ‘कांटा लगा गर्ल’ या टॅगचा कंटाळा येतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शेफालीने हसत-हसत उत्तर दिलं होतं. “मला कधीच ‘कांटा लगा गर्ल’ या टॅगचा कंटाळा येणार नाही. कारण ही ओळख मला खूप आवडते…मी मरेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला ‘कांटा लगा गर्ल’ या नावाने ओळखलं जावं हीच माझी मनापासून इच्छा आहे.” अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या होत्या.

मात्र, निधनानंतर शेफालीची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. शेफाली जरीवालाच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती, पण तिला बाळ नव्हतं. त्यामुळेच तिला एका मुलीला दत्तक घ्यायचं होतं. याचा उल्लेख तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये देखील केला होता. यासाठी प्रक्रिया सुद्धा सुरू होती मात्र, शेफालीची ही इच्छा आता अपूर्ण राहिली आहे.

शेफालीचं शुक्रवारी ( २७ जून ) मध्यरात्री निधन झालं. अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी शेफालीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काम्या पंजाबी, रश्मी देसाई, मिका सिंग, अली गोनी आणि दिव्यांका त्रिपाठीसह अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, शेफालीच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.