बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच सलमान खानला एका न्यायलयीन प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सलमानला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३ वर्षांपूर्वी एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यानी समन्स बजावत त्याला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयाने दिले होते. आज (५ एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सलमानला दिलासा दिला आहे.

संबंधित पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच सलमानला न्यायालयात हजर राहण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण ३ वर्षांपूर्वीचे म्हणजे २४ एप्रिल २०१९ चे आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय?

एका टीव्ही चॅनलचे पत्रकार अशोक पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. अशोक पांडे हे सलमान खान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ शूट केला होता. मात्र या व्हिडीओमुळे सलमानच्या अंगरक्षकाने आणि सलमानने असभ्य वर्तन केल्याचा आरोप अशोक पांडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मोबाईलही हिसकावत धमकावल्याचाही आरोप त्याने केला आहे.

पत्रकार अशोक पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, ते त्यांच्या कॅमेरामनसोबत जुहूहून कांदिवलीला कारने जात होते. त्यावेळी एका रस्त्यावर त्यांना सलमान खान सायकल चालवताना दिसला. यादरम्यान त्याने सलमानचा व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या दोन अंगरक्षकांची परवानगी मागितली. त्या अंगरक्षकांनीही त्याला परवानगी दिली होती.

मात्र जेव्हा मी व्हिडीओ बनवत होतो तेव्हा मात्र सलमानने मला विरोध केला. त्यानंतर त्याच्या अंगरक्षकानेही त्याला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. सलमान खाननेही या पत्रकाराला मारहाण केली आणि नंतर त्याचा फोन हिसकावून घेतला, असा आरोप त्याने केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

याप्रकरणी त्यांनी अंधेरीतील डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात अशोक पांडे यांनी सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक नवाज इक्बाल शेख यांच्यावर शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court stays summons issued to salman khan in journalist complaint case nrp
First published on: 05-04-2022 at 14:18 IST