|| गायत्री हसबनीस

‘नो टाइम टु डाय’ या बॉण्डपटाचा ट्रेलर डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय याबद्दल उत्सुकता ही जगभरातील प्रेक्षकांना होती. शेवटी तो सप्टेंबर २०२१ मध्ये भारतात प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत तिकीटबारीवर या चित्रपटाचा हल्लाबोल सुरूच आहे. या चित्रपटाने जगभरात  ६१ कोटी डॉलर्सची कमाई केली असून भारतात पहिल्या दहा – बारा दिवसांत या चित्रपटाने तीस-पस्तीस कोटींचा गल्ला भरला आहे. चार आठवड्यांपूर्वी या चित्रपटाचा जेव्हा शानदार वल्र्ड प्रीमियर करण्यात आला तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी चर्चाही सुरू झाली होती, अनेकांनी त्याच वेळी चित्रपटाला घसघशीत पसंतीही दिली होती. अर्थात, जगभरात बॉण्डपटांविषयी असलेले आकर्षण आणि त्याला लाभलेले वलय हेच ‘नो टाइम टु डाय’ला मिळालेल्या या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे असे म्हणावे लागेल.

‘स्कायफॉल’ या चित्रपटानंतर ‘नो टाइम टु डाय’ या बॉण्डपटाला मिळालेले यश हे दखल घेण्याजोगेच आहे. ‘स्कायफॉल’ या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने जगभरातून अब्जावधी डॉलर्सची कमाई केली होती. ‘नो टाइम टु डाय’ला या कसोटीवर मापणं शक्य होणार नाही, कारण दोन्ही चित्रपटांच्या वेळची जगभरातील परिस्थिती वेगवेगळी आहे. करोनाशी सगळ्यांचीच झुंज सुरू असताना जवळपास दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा बॉण्डपट प्रदर्शित होऊ शकला आहे. मात्र एकू णच बॉण्डपटांची अ‍ॅक्शन, कथा, मुख्य कलाकाराचा अभिनय आणि बॉण्डला असलेलं वलय या गोष्टी आजही तशाच आणि तितक्याच लोकप्रिय आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खरंतर हॉलीवूडच्या चित्रपट मालिकांमध्ये वेगवेगळ्या बॉण्ड नायकांबरोबर प्रदीर्घ काळ लोकांच्या मनावर राज्य करणारे चित्रपट म्हणून बॉण्डपट ओळखले जातात. आज मार्व्हलपटांना जे यश मिळते आहे ते या बॉण्डपटांनी वर्षानुवर्षं अनुभवलेलं आहे आणि टिकवलंही आहे.

‘स्कायफॉल’चे ग्लॅमर हे अर्थात वेगळे होते असं एक प्रेक्षक म्हणून जाणवते, कारण तेव्हा जेम्स बॉण्डचे शत्रू, मित्र, त्याचा प्रणय आणि त्याने अनुभवलेला थरार हे टिपिकल बॉण्डपटांप्रमाणे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. मात्र ‘नो टाइम टु डाय’ हा या साचेबद्ध धाटणीपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे द्वंद्व पाहायला मिळते. जेम्स बॉण्डचा प्रवास, त्याचा लढा वर्तमानकाळानंतर पाहायला मिळतो. या चित्रपटात कथेला विज्ञानाचा आणि आज घडणाºया घटनांची नांदी म्हणावी असा काहीएक संदर्भही आहे. हेरॅकल्स या जैविक शस्त्रामुळे या कथेत एक वेगळे वळण येते, कारण ते शस्त्र बनवणाºया ऑब्रूचेव नामक शास्त्रज्ञाला शोधण्यापूर्वी जेम्सची असलेली मानसिकता आणि नंतर जेव्हा तो त्याला शोधण्यासाठी तयार होतो त्यानंतरची त्याची मानसिकता खूप ठळकपणे या चित्रपटातून आली आहे. जेम्स बॉण्डच्या आयुष्यात एका वळणावर येणारं प्रेम, फसवणूक आणि शत्रूशी झुंज हे सगळं एका बॉण्डपटाला साजेशा पद्धतीनेच प्रेक्षकांसमोर येत राहतं. या चित्रपटाचा शेवट हळवा आहे. उत्तम छायाचित्रण आणि कलादिग्दर्शनाच्या जोरावर या बॉण्डपटाने प्रेक्षकांची मनं जिंकू न घेतली आहेत.