अभिनेत्री दीपिका पादुकोन सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने याच सोशल मीडियाच्या साहाय्याने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एका मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा तिने राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिकाने मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज म्हणजे MAMI या संघटनेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना ती म्हणते, “या संघटनेच्या संचालक मंडळात असणं आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणं हा खरंच खूप काही शिकवणारा अनुभव होता. कलाकार म्हणून जगभरातून चित्रपट आणि प्रतिभावान कलावंतांना मुंबईमध्ये केंद्रित करणं हे खूप जबाबदारीचं आणि महत्त्वाचं काम होतं. पण मला असं लक्षात आलं आहे की, माझ्या कामाचं सध्याचं नियोजन पाहता मला वाटत नाही की मी MAMI च्या कामाकडे आवश्यक तेवढं लक्ष देऊ शकेन. मला आशा आहे की ही संघटना योग्य हातात सोपवली जावी. माझे या संघटनेशी असलेले ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम राहतील.”

दीपिकाने २०१९ साली MAMIच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

आपल्या या पोस्टची सुरुवात करताना दीपिका म्हणते, “आपल्याला कधी एकटं वाटू न देण्याची ताकद चित्रपटात आहे. या डिजीटल स्ट्रिमिंग आणि सोशल मीडियाच्या युगात आपण हळूहळू स्वतःला एकटं करुन घेत आहोत. पण MAMI ही संस्था सीमांची सर्व बंधनं झुगारून आपल्याला एकत्र बांधून ठेवत आहे. एक कलाकार म्हणून मला चित्रपटाच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी तर म्हणेन आपल्याला आत्ता त्याची गरज आधीपेक्षाही जास्त आहे.”

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच रणवीर सिंगसोबत ‘८३’ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट माजी क्रिकेटवीर कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. त्याचबरोबर ती अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबतही आगामी चित्रपटात दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika resigns as a chairperson of mami vsk
First published on: 12-04-2021 at 13:52 IST