रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने तिच्यावर चित्रपट बनावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. प्रो कुस्ती लीग स्पर्धेत साक्षी दिल्ली सुलतान संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात साक्षी बोलत होती. कुस्ती लीगची तयारी करतानाच जकार्ता येथे होणार असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा तर गोल्ड कोस्ट येथे होणार असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेवर साक्षीने लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, माझ्यावर चित्रपट बनला तर मला निश्चितच आवडले असे सांगत साक्षीने या चित्रपटाद्वारे पारंपारिक खेळाचा (कुस्ती) प्रचार व्हायला हवा असे म्हटले आहे. मात्र, यात बॉलीवूडमधील कोणती अभिनेत्री तिची भूमिका साकारणार हे साक्षीने स्पष्ट केले नाही.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साक्षी म्हणाली की, ‘कुस्तीवर आधारित ‘दंगल’ चित्रपटामुळे खेळाच्या प्रसारासाठी मदतच होईल. याआधी ‘सुलतान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. कुस्तीवर दोन चित्रपट येणे अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. माझ्या कारकीर्दीवर चित्रपट बनवण्यास कोणी इच्छुक असेल आणि यामुळे खेळाचा प्रचार होणार असेल तर नक्कीच माझ्यावर चित्रपट आलेला मला आवडेल. हा चरित्रपट तरुणांना प्रेरणा देऊ शकतो,’ असे साक्षीने सांगितले. पुढे साक्षी म्हणाली की, चित्रपटात माझी भूमिका कोणी करावी याबाबत मी काहीही विचार केलेला नाही. ते माझे काम नाही.
यावर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले होते. ८-५ अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केलेले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत साक्षीने तेव्हा उत्तम खेळ केला होता. साक्षी ही ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली. साक्षीच्या रूपाने ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्यांदा एखाद्या भारतीय महिला खेळाडूने पदकावर नाव कोरलेले. हरियाणाच्या २३ वर्षीय साक्षीने यापूर्वी २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक तर आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.