scorecardresearch

‘आमिरचा सल्ला न ऐकल्याचं वाईट वाटतंय..’

‘तू झुठीं मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने कोलकत्त्यात असलेल्या रणबीरने माध्यमांशी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

amir khan ranbir kapoor
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रणबीर कपूर सध्या ‘तू झुठीं मै मक्कार’ या चिवित्र नावाच्या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. एरवीही त्याच्यावर कायमच माध्यमांची नजर असते, मात्र तो स्वत:हून कधी माध्यमांशी फारसा बोलत नाही. तशी कोणाचीही भीड न बाळगणाऱ्या रणबीरने आमिर खानने आपल्याला दिलेला सल्ला न ऐकल्याबद्दल आजही खंत वाटते आहे, असं सांगत सगळय़ांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आमिरने रणबीरला असा काय सल्ला दिला होता?..

‘तू झुठीं मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने कोलकत्त्यात असलेल्या रणबीरने माध्यमांशी मनमोकळय़ा गप्पा मारल्या. आयुष्यात यश-अपयश दोन्हींचा सामना कसा करतोस? या प्रश्नाला उत्तर देताना त्याने कारकीर्दीच्या सुरुवातीलाच यश किंवा अपयश दोन्ही गोष्टींपासून अलिप्त राहायचं आपण ठरवलं होतं, असं सांगितलं. पण आयुष्यात अपयशाच्या गोष्टी तुम्हाला खूप काही शिकवून जातात. आणि माझ्यासारखा कलाकार ज्याला बोलण्यासाठी माध्यम उपलब्ध आहे त्याने आपल्याला आलेलं अपयश आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल बोलायलाच हवं. जेणेकरून इतरांना त्यापासून काही धडा घेता येईल, असं त्याने सांगितलं. हे सांगत असतानाच कारकीर्दीची सुरुवात करण्याआधी अभिनेता आमिर खानने आपल्याला असाच मोलाचा सल्ला दिला होता, मात्र आपण आजपर्यंत त्यावर अंमल करू शकलो नाही, याबद्दल त्याने खंत व्यक्त केली.

चित्रपट क्षेत्रात येण्याआधी आमिरने ‘बॅग पॅक कर आणि देशभर भटकंती कर. आपल्या देशातील भिन्न भिन्न संस्कृतींचा अनुभव घे. वेगवेगळय़ा लोकांना भेट. आपला देश समजून घे. शिवाय, हरएक प्रकारची व्यक्तिमत्वं जी तुला भेटतील त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा कुठे तुला नानाविध व्यक्तिरेखा आतून उमगतील आणि पडद्यावर त्या रंगवता येतील’ असा सल्ला रणबीरला दिला होता. आमिरचा हा सल्ला मला अमलात आणता आला नाही, याचं वाईट वाटतं असंही त्याने यावेळी कबूल केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 01:01 IST