चित्रीकरणासाठीच्या शंभर उत्कृष्ट स्थळांची निवड
गोरेगावमधील चित्रनगरीत लागणारे वेगवेगळे सेट्स, मुंबईच्या गर्दीतील रस्ते ते सातारा-वाई परिसरात नित्याने होणारे हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रीकरण, रेल्वे स्थानक आणि परिसरात होणारी चित्रीकरणे इतक्या विविध माध्यमांतून चित्रपट उद्योगाची पाळेमुळे मुंबईसह राज्यात विखुरलेली आहेत. मात्र याचा पर्यटनवृद्धीसाठी वापर करण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत झाला नव्हता. आता चित्रपट पर्यटनाची जगभर लोकप्रिय असलेली संकल्पना राज्यात राबवण्याच्या दृष्टीने एमटीडीसीने पावले उचलली आहेत. या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील चित्रीकरणासाठी उत्कृष्ट ठरतील अशा शंभर पर्यटनस्थळांची यादी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चित्रपट पर्यटनाचा वापर दोन पद्धतीने होतो. एक तर जास्तीत जास्त चित्रपटकर्मीना आपल्याकडे चित्रीकरणासाठी बोलवायचे. त्यामुळे चित्रपटांच्या माध्यमातून ही पर्यटनस्थळे जगभर पोहोचतात.
दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या ठिकाणी चित्रीकरण सुरू झाल्यानंतर आपोआपच लोकांची गर्दी त्या ठिकाणी वाढते आणि त्यातून पर्यटनासंदर्भातच छोटे-मोठे रोजगार उपलब्ध होतात. यासाठी आपल्याकडे जी पर्यटनस्थळे आहेत त्यात चित्रीकरणासाठी कोणत्या जागा उपयुक्त ठरतील, तिथे त्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत का? याची तपशीलवार नोंद करून अशा शंभर उत्कृष्ट जागांची यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांनी दिली. या यादीत त्या त्या ठिकाणांबरोबरच तिथे चित्रीकरणासाठी कोणाची मदत मिळेल, त्यांचे संपर्क क्रमांक-पत्ते यांचाही समावेश करण्यात येणार असून तीन महिन्यांत ही यादी ‘एमटीडीसी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या पर्यटनस्थळावंर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मिळाव्यात, यासाठी गोरेगाव येथील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’त एक खिडकी योजनाही कार्यान्वित होणार असून त्याची जबाबदारी चित्रनगरीच्या अधिकाऱ्यांकडे असणार आहे. याशिवाय, सध्या चित्रनगरीचे नूतनीकरण सुरू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर तेच पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल. चित्रनगरीत काही सेट्स खास पर्यटकांना पाहण्यासाठी बनवण्यात येणार असून चित्रीकरण कशा पद्धतीने होते, त्याचा नमुना तेथे पाहता येईल.
‘सुलतान’ आणि ‘रईस’च्या सेटवर पर्यटक
सध्या ज्या ‘फिल्मसिटी टुर्स’ सुरू आहेत त्यात सातत्याने नवनवीन गोष्टींची भर पडते आहे. चित्रनगरीत जिथे जुन्या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे अशा काही जागा दाखवल्या जातात. त्या जागेवरील चित्रीकरणाचे फुटेज पर्यटकांना दाखवले जाते, मग प्रत्यक्ष ती जागा त्यांना पाहता येते. सलमान खानच्या ‘सुलतान’चे आणि शाहरूख खानचा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘रईस’चे चित्रीकरणही चित्रनगरीत झाले होते. या दोन्ही चित्रपटांचे सेट्स सध्या पर्यटकांना या टुर्समध्ये पाहता येतात. याशिवाय, चित्रपट कलाकारांची घरे पाहायला मिळावीत, ही पर्यटकांची मागणी होती. त्यामुळे ‘मुंबई दर्शन टुर्स’मध्येही प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकारांच्या घरांचे दूर‘दर्शन’ही पर्यटकांना घडवण्यात येत असल्याचे वल्सा नायर-सिंग यांनी सांगितले.