कॅन्सरशी लढा देणारी अभिनेत्री हिना खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. हिना खानने तिचा प्रियकर रॉकी जयस्वालबरोबर लग्न केलं. हिना खान आणि रॉकीने लग्न करताच अनेकांनी त्यांचं कमेंटच्या माध्यमातून अभिनंदन केलं. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. या कठीण काळात रॉकीने तिची साथ सोडली नाही.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचा प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हिनाने या खास प्रसंगाचे फोटो आधीच शेअर केले आहेत. आता तिने लग्नाच्या दिवसाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये हिना आणि रॉकी लग्नाची शपथ घेताना दिसत आहेत. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत हिना एक हृदयस्पर्शी शपथ वाचते. ती रॉकीला सांगते, “प्रेम करणे सुंदर आहे, पण एखाद्या स्त्रीला स्वीकारणे, तेही जेव्हा तिच्या आयुष्यात खूप अनिश्चितता असतात… मला माहीत नाही की उद्या काय होईल. माझ्या सर्व दोषांसह मला स्वीकारणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे, खूप खूप धन्यवाद.”

रॉकी हिनाला म्हणतो, “हिना फक्त माझं जग नाहीये, ती माझा आत्मा आहे, माझं हृदय आहे. ती हसते तेव्हाच सगळं काही महत्त्वाचं असतं, म्हणून प्रत्येकाने ती नेहमी हसत राहावी याची खात्री करावी. माझं तुझ्यावर प्रेम आहे.” यावर हिना उत्तर देते, “माझंही तुझ्यावर प्रेम आहे.”

बुधवारी हिनाने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. हिना वधूच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती. तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ओपल ग्रीन हँडलूम साडी घातली होती, ज्यावर सोनेरी आणि चांदीच्या धाग्याने पारंपरिक डिझाइन बनवले होते. रॉकीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ऑफ-व्हाइट कुर्तादेखील घातला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर हिना आणि रॉकीची पहिली भेट झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी हा त्याचा निर्माता होता. याच मालिकेत एकत्र काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हिना खानच्या चांगल्या-वाईट काळात रॉकीने तिची खंबीर साथ दिल्याचं पहायला मिळालं. गेल्या वर्षी जून महिन्यात तिने ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आयुष्यातील या सर्वांत कठीण काळात रॉकीने तिला पाठिंबा दिला. हळूहळू हिना त्यातून बरी होत असल्याचं पहायला मिळत आहे.