हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्याला हवे त्या पद्धतीने चित्रपट करत राहणं तेही व्यावसायिकतेची सगळी गणितं सांभाळून हे खचितच सोपं नाही. मात्र गेली काही वर्षे जाहिरात क्षेत्रात आणि चित्रपट क्षेत्रात चोखंदळ वाटचाल करत आपला नावलौकिक टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये अभिनय देव यांचं नाव घेतलं जातं. ‘सावी’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारताना नव्या चित्रपटातही सत्यवान – सावित्री या पौराणिक कथेचा आधार घेत आजच्या संदर्भाने कथा गुंफण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गेम’ या चित्रपटाद्वारे अभिनय यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘दिल्ली बेली’, ‘ब्लॅकमेल’, ‘फोर्स २’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘सावी’ या आगामी चित्रपटातून एक सामान्य स्त्री आपल्या परिवाराला संकटातून बाहेर काढण्यासाठी किती असामान्य काम करू शकते हे मांडण्यात आले आहे. या चित्रपटाची संकल्पना कशी सुचली याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘सावी’ हा एका सर्वसामान्य स्त्रीची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. चित्रपटाची गोष्ट जरी आजच्या काळातील असली तरी या चित्रपटाचे मूळ हे सत्यवान-सावित्री यांच्या कथेवरून प्रेरित आहे. सावित्री ज्याप्रकारे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी यमराजाबरोबर लढली होती. त्याच प्रकारे या चित्रपटातील सावीदेखील तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी काय काय करते याचे चित्रण करताना स्त्रीची खंबीरता, तिच्या अमर्याद क्षमता दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

कुठे तरी सावीच्या व्यक्तिरेखेची प्रेरणा ही आपल्या आईकडून मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘मी लहानपणापासून माझ्या आईला सीमा देव यांना पाहात आलो आहे. तिला पाहताना जाणवले एक स्त्री ही पुरुषांपेक्षा शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक कणखर असते. हा मूळ या चित्रपटाच्या कथेचा पाया आहे. एका साध्या-सरळ घर सांभाळणाऱ्या स्त्रीच्या कुटुंबावर संकट ओढवते, त्या वेळी ती असे काही अनन्यसाधारण काम करते, जे ती स्वत: करू शकते यावर तिचा स्वत:चादेखील विश्वास बसला नसता. अशी स्त्री आपण आपल्या अवतीभवती पाहात असतो. सावी हे त्या स्त्रियांचं प्रतिबिंब आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नितळ, निरागस भावविश्वाचं दर्शन

कलाकारांची विचारपूर्वक निवड…

प्रत्येक चित्रपटाची मदार त्याच्या कलाकारांवरही असते. त्यामुळे कलाकारांची निवड विचारपूर्वकच केली जाते, असे अभिनय यांनी सांगितले. या चित्रपटात सावीचे मुख्य पात्र अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी साकारले आहे. तर, हर्षवर्धन राणे आणि अनिल कपूर यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सावीच्या भूमिकेत अमुक एक अभिनेत्री फिट बसणार नाही, असा समज जिच्या बाबतीत होईल असाच चेहरा आम्ही शोधत होतो. आणि दिव्या खोसला कुमार या समीकरणात अगदी चपखल बसेल हे आमच्या लक्षात आले. दिव्याने आत्तापर्यंत गोड स्वभावाची, चुळबुळ्या वृत्तीची तरुणी साकारली आहे. मात्र नवऱ्याला वाचवण्यासाठी अगदी तुरुंग तोडून बाहेर पडण्याची धडपडणारी स्त्री ती साकारू शकेल का? ही शंका पाहणाऱ्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली जाईल हा विचार करूनच आम्ही तिची निवड केली, असे अभिनय यांनी सांगितले. तर अनिल कपूर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे आहेत. ते कंगोरे उत्तमपणे पेलून अभिनयातून दाखवणारा ताकदीचा कलाकार आम्हाला त्यांच्या रूपाने मिळाला. तर लग्न झाल्यानंतर जबाबदारीने वागणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत हर्षवर्धनची निवड अचूक ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘विनोदाच्या नावाखाली काहीही चालणार नाही’

तर मी उत्तम आर्किटेक्ट झालो असतो…

अभिनय यांचं पूर्ण कुटुंबच चित्रपट क्षेत्रात रमलेलं, त्यातही आई-वडील आणि भाऊ अजिंक्य देव हे तिघेही अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर असताना अभिनय यांनी मात्र दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याविषयी बोलताना, माझ्या आई – वडिलांनी माझ्या मोठ्या भावाचे नाव अजिंक्य ठेवले ज्याला अभिनयाची आवड आहे. आणि माझे नाव अभिनय ठेवले, मात्र मला अभिनय करण्यापेक्षा अभिनय करून घेण्यात अधिक रस आहे. त्यामुळे नावांची अदलाबदल झाली असे सतत मला वाटते, असे ते गमतीने सांगतात. ‘मी शाळेत आठवीत असताना पहिल्यांदा नाटकासाठी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला. त्या वेळी मला पहिले बक्षीस मिळाले. मला गोष्ट सांगायला आवडते हे मला त्या वेळी पहिल्यांदा लक्षात आले. हळूहळू शिक्षण सुरू असताना मला गोष्ट सांगायला आणि दाखवायलाही आवडते हे पक्के लक्षात आले. त्यामुळे आर्किटेक्ट झाल्यानंतरही जे काम करायला आवडते त्यात एकदा प्रयत्न करून पाहिला पाहिजे म्हणून मी या क्षेत्रात प्रयत्न करून पाहिला आणि हा प्रयत्न यशस्वी झाला. मला सुरुवातीपासून चित्रकलेची आवड होती, त्यामुळे मी स्थापत्यशास्त्राचे शिक्षणदेखील तन्मयतेने पूर्ण केले. जर चित्रपट क्षेत्रात मी यशस्वी झालो नसतो तर मी नक्कीच उत्तम आर्किटेक्ट असतो’ असे त्यांनी सांगितले.

आईला नेहमी संघर्ष करताना पाहिले आहे…

‘मी माझ्या आईला सावित्री मानतो. आई आणि बाबा दोघेही अभिनय क्षेत्रात होते. या क्षेत्रात काम करताना कधी आईला काम असायचे, तर कधी बाबांना खूप काम असायचे. अनेकदा दोघांनाही काम असायचे किंवा नसायचे. मात्र या सगळ्याची झळ तिने मला आणि माझ्या भावाला कधीच बसू दिली नाही. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने झगडत होती, त्यामुळे तिला नेहमी संघर्ष करताना आणि आपल्या मुलांसाठी तत्पर असलेली आम्ही पाहिले आहे’ अशी आईची आठवणही त्यांनी सांगितली.

वाट वाकडी करायला अधिक आवडते… ’

अभिनय देव यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली आहे. स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेत असताना इमारतीच्या आराखड्यांमध्ये काही तरी वेगळे करायचे. नवीन प्रकारे त्याची रचना सादर करायची हा प्रयत्न असायचा, त्याच पद्धतीने चित्रपट करतानाही वेगळे काही तरी करण्याचा ध्यास मला लागला, असे त्यांनी सांगितले. नेहमीच्या पाऊलवाटेवरून चालण्यापेक्षा थोडी वाकडी वाट करून नवे काही धुंडाळायला मला आवडते, त्यामुळे माझे चित्रपट वेगळे असतात. त्यासाठी चित्रपटांचा विषयही तोच तोच ठरीव साच्यातील निवडायचा नाही, असे मी ठरवले होते. सहज न रुचणाऱ्या विषयांवर आधारित चित्रपट चालतील न चालतील हा नंतरचा भाग, पण हे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या सामान्य आयुष्यातील वेगळी छटा दिसली पाहिजे हा विचार मी सतत करत आलो आहे, असे त्यांनी सांगितले.