अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आपल्या अभिनयाने आणि आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकतंच हाती आलेल्या माहितीनुसार जॅकलीन आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हाती असलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून ती या नव्या चित्रपटाच्या कामाकडे वळेल.

जॅकलीन सध्या ‘रामसेतू’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री नुसरत भरुचा हे कलाकार दिसणार आहेत. मात्र, अक्षय कुमार तसंच या चित्रपटाच्या सेटवरील काही कलाकारांना करोनाची लागण झाल्याने या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे जॅकलीन सध्या अलगीकरणात आहे. सध्या ती जरी छोट्याश्या ब्रेकवर असली तरी तिच्या हातात अनेक चांगले चित्रपट आहेत. आता तिने अजून एक चित्रपट स्वीकारला असल्याची माहिती समोर येत आहे.

हा चित्रपट ऍक्शन थ्रिलर असून याची निर्मिती भूषण कुमार यांची आहे. या चित्रपटाचं शीर्षक सध्यातरी ‘दिया’ हे असल्याचं वृत्त आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये होणार असून ते साधारणतः जूनमध्ये सुरु होईल. ‘रामसेतू’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून जॅकलीन या नव्या चित्रपटासाठी काम सुरु करेल. देशातल्या तसेच परदेशातल्या करोना परिस्थितीनुसार या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांच्या नियोजनानुसार संपूर्ण चित्रपट लंडनमध्ये चित्रीत होईल. मुंबईमध्ये याचं कोणत्याही प्रकारचं पॅच वर्क वगैरे होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामसेतू आणि दिया याव्यतिरिक्त जॅकलीन सध्या ‘अटॅक’ या चित्रपटातही काम करत आहे. यात तिच्यासोबत जॉन अब्राहम आणि राकुल प्रीत सिंग हे कलाकार दिसतील. तर ‘भूत पुलिस’ या चित्रपटात ती सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम या कलाकारांसोबत दिसेल. रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ या चित्रपटातही ती दिसेल तर ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातही ती भूमिका साकारणार आहे.