केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत एक विचित्र प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. स्मृती इराणी यांनी लिहिलेलं एक पुस्तक नुकतच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी स्मृती इराणी प्रसिद्ध अशा कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये येणारा होत्या. मात्र आता त्यांनी आता या शोमध्ये न येण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार स्मृती इराणी जेव्हा शुटिंगनिमित्त सेटवर जाण्यासाठी पोहचल्या तेव्हा त्यांना गेटवरील सुरक्षारक्षकाने ओळखलं नाही आणि आतमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. स्मृती इराणी या त्यांच्या गाडीने या शुटिंगसाठी पोहचल्या होत्या. मात्र सेटच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकाने त्यांची गाडी आडवली. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि इराणी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरमध्ये बराच वेळ वाद झाला. अखेर संतापलेल्या स्मृती यांनी शुटिंग न करताच परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक कलाकार आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी येतात. यावेळेस एकेकाळी छोट्या पडद्यावरील सर्वात लाडकी सून साकारणाऱ्या आणि सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळाच्या सदस्य असणाऱ्या स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी या शोवर येणार होत्या. टेली चक्कर या छोट्या पडद्यावरील मालिकांसंदर्भात वृत्तांकन करणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा आणि स्मृती इराणी यांना यासंदर्भात काहीच माहिती नव्हती. सर्व प्रकरण हे चालक आणि सुरक्षारक्षकामधील वादामुळे घडलं आणि फार वेळ वाट पहावी लागत असल्याने चिडून स्मृती इराणी यांनी परतण्याचा निर्णय घेतल्याने शुटिंग रद्द करावं लागलं.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार तेथे असणाऱ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्मृती इराणी त्यांच्या चालक आणि इतर दोन जणांसोबत कपिल शर्मा शोच्या सेटवर शुटिंगसाठी पोहचल्या होत्या. मात्र सेटच्या गेटवरील सुरक्षारक्षक त्यांना ओळखू शकला नाही. त्याने या गाडीला आतमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. त्यावेळेस गाडी चालवणाऱ्या चालकाने आम्हाला शुटिंगसाठी बोलवण्यात आलंय असं सांगितलं. मात्र आपल्याला अशी कोणतीही गाडी आतमध्ये सोडण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीय. त्यामुळे गाडी मी आत सोडणार नाही, असं सुरक्षा रक्षकाने सांगितलं. त्यावेळेस एक फूड डिलेव्हरीवाला तेथे पोहचला. त्याला न आडवता आतमध्ये प्रवेश देण्यात आला. एकीकडे आपल्या गाडीच्या चालकासोबत एवढा वेळ वाद सुरु असताना फूड डिलेव्हरी बॉयला अशापद्धतीने जाऊ दिल्याचं पाहून स्मृती इराणी यांना अपमानस्पद वागणूक दिली जात असल्यासारखं वाटल्याने त्यांनी शुटिंग न करताच परतण्याचा निर्णय घेतला.

कपिल शर्मा आणि प्रोडक्शन हाऊसला यासंदर्भातील माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्मृती इराणी यांची माफी मागत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती इराणी यांनी शूटींग न करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. समोर आलेल्या वृत्तानुसार आपण केंद्रीय मंत्र्यांना गेटवर थांबवलं आणि नंतर जो काही गोंधळ झाला याबद्दल त्याला समजल्यानंतर त्याने भीतीपोटी आपला फोन स्वीच ऑफ केलाय.