Gautami Patil Sundara Song : गौतमी पाटीलचं नवीन रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘सुंदरा’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात गौतमी पाटीलबरोबर अभिनेता निक शिंदे झळकला आहे. मागील अनेक दिवसांपासून या गाण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
गाण्यात गौतमी व निक शिंदेचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतोय. गौतमीच्या खट्याळ अदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर सुंदर लोकेशनवरील चित्रीकरण प्रेक्षकांच्या नजरा स्क्रीनवरून हटू देत नाही. निकचा डान्सही उत्तम आहे.
गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी ‘सुंदरा’ गाण्याला आवाज दिला आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ‘टिंग्या’, ‘लालबागची राणी’, ‘लूज कंट्रोल’, ‘ख्वाडा’, ‘टीडीएम’, ‘लगन’ अशा अनेक चित्रपटांना आजवर संगीत दिले आहे.
पाहा व्हिडीओ
गौतमी पाटील सुंदरा गाण्याबद्दल म्हणाली, “कृष्ण मुरारी या गाण्याच्या यशानंतर माझं सुंदरा हे गाणं प्रदर्शित झालं आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जसं तुम्ही कृष्ण मुरारी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम सुंदरा या गाण्याला द्या. सुंदरा या गाण्यावर सुंदर रील व्हिडीओ बनवा.”
गायिका सोनाली सोनवणे गाण्याच्या रेकॉर्डिंगबद्दल म्हणाली, “गाण्याचं नावच सुंदरा आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं किती सुंदर असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला गाताना खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. मी आणि रोहित राऊतने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं संगीत रोहित नागभिडे यांनी केलं असून वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहीलं आहे.”