दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यांसमोर उभा राहतो एक हसमुख चेहरा, धमाल विनोदी-हरहुन्नरी अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलीय एक खास ओळख ‘पद्मश्री अशोक सराफ’. फक्त स्टार होणं सोपं असतं पण, आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांनाच जमतं. त्यांच्या कलेला अभिवादन करण्यासाठी खास ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.
अल्ट्रा झकास ओटीटीवर ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ साजरा केला जाईल. अशोक सराफ यांचा जगभरात गाजलेला ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट तर सगळ्यांना माहितीच आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहेत.
अशोक सराफ यांनी ‘अफलातून’ (1991) मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावांची विनोदी भूमिका साकारली होती. तर त्यांचा ‘एक डाव भुताचा’ (1982) सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता. ‘आपली माणसं’, ‘वजीर’, ‘इना मिना डिका’, ‘सून माझी लाडकी’, ‘ऐकावं ते नवलच’, ‘देवघर’, ‘पैंजण’, ‘मोस्ट वाँटेड’, ‘कोणासाठी कुणीतरी’, ‘डीड शहाणे’, ‘या टोपीखाली दडलंय काय?’, ‘आंधळी कोशिंबीर’ असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत महत्त्वाचे ठरले.
अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाहीत तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहेत, जे चित्रपट एकदा पाहिले की, पुन्हा-पुन्हा आठवतात आणि म्हणूनच, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर खास ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
अशोक सराफ यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने २०२३ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. २०२२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. याचबरोबर त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
याबाबत, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकाराला मिळणं ही संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच अशोक मामांच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे.”