काही दिवसांपूर्वी हॉरर-कॉमेडी ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या हटके पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

झोंबिवली या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा झोम्बी या कल्पनेवर आधारित आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे.

अभिनेता ललित प्रभाकरने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ललितने ‘झोब्यांच्या टोळीला रोखण्याचा नाहीए कुणालाच क्लू! तयार रहा मित्रांनो ते तुमच्यासाठी येत आहेत. झोबिंवली हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोम्बीज मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. रोमँटिक, जॉली भूमिका केलेले मराठी चेहरे हॉरर भूमिकेत दिसणार आहेत. या पूर्वी हा चित्रपट ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.