Best Crime Thriller Movie on Jio Hotstar : मागच्या काही काळापासून क्राइम थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. थरारक कथानक असलेले चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. दृश्यम, अंधाधुन, तलाश, कहानी, बदला, गुप्त: द हिडन ट्रुथ, जॉनी गद्दर, इत्तेफाक, उग्गर असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर गाजले होते आणि आताही लोक पाहत असतात. असाच एक चित्रपट आहे, जो तुम्हाला २ तास ४५ मिनिटं जागेवरून हलू देणार नाही. हा थरारक क्राइम थ्रिलर चित्रपट पाहून तुम्ही स्तब्ध व्हाल. सिनेमाच्या प्रत्येक दृश्यात असे नवीन ट्विस्ट समोर येतात, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

‘थुंडरम’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मल्याळम भाषेतील हा एक उत्तम क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मोहनलाल यात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत शोभना, प्रकाश वर्मा, मनियम्पिला राजू, भारतीराजा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाची कथा

या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, बेंजामिन उर्फ ​​बेंझ हा एक सामान्य टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. बेंझ खूप चांगला माणूस आहे, त्याच्याजवळ एक कार आहे. त्या कारवर त्याचं प्रचंड प्रेम आहे आणि तो ती कार खूप जपतो. तो कोणालाही त्याची गाडी चालवायला देत नसतो. पण, एकदा त्याच्या गाडीचा अपघात होतो, तो ती कार दुरुस्तीसाठी देतो. ती दुरुस्त करणारा मेकॅनिक गाडी चुकीच्या कामांसाठी वापरतो. यानंतर पोलीस गाडी जप्त करतात. पोलिसांपासून गाडी सोडण्यासाठी बेंझला खूप त्रास सहन करावा लागतो. पण शेवटी त्याला त्याची गाडी परत मिळते.

कथेत एक मोठा ट्विस्ट येतो. बेंझचा मुलगा अचानक गायब होतो. तो पोलिसात तक्रार दाखल करायला जातो. त्याच वेळी एक धक्कादायक गोष्ट समोर येते. यामुळे बेंझचे आयुष्यात उलथापालथ होते. पण ती धक्कादायक गोष्ट काय आहे? त्याचा मुलगा कुठे गेला? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटाची कथा साधेपणाने सुरू होते आणि नंतर थ्रिलर मोडमध्ये जाते. या चित्रपटाचा सेकंड हाफ तर खिळवून ठेवणारा आहे.

मोहनलाल यांच्या ‘थुंडरम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आता तो ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. २९ मे रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला ‘थुंडरम’ आता टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील झाला आहे. देशातील टॉप १० यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाच्या निर्मितीवर सुमारे ९० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या चित्रपटाने भारतात १२१.२ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात २०० कोटी रुपये कमावले आहेत. शेवटच्या टप्प्यात ‘थुंडरम’ने जगभरात २३४.५ कोटी रुपये कमावले आहेत. मल्याळम भाषेतील हा चित्रपट तरुण मूर्ती यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला IMDb वर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.