पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केल्यामुळे शाळा, महाविद्यालये, ऑफिस सारं काही बंद आहे. त्यामुळे नागरिक सध्या घरीच असून या फावल्या वेळात करावं काय असा प्रश्न त्यांना सतावत होता. यावर तोडगा म्हणून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दुरदर्शन पुन्हा एकदा ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा एकदा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकांसोबतच ‘मालगुडी डेज’, ‘चाणाक्य’ आणि ‘द जंगल बुक’ या मालिकादेखील पुन्हा एकदा दाखविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

‘फिल्मीबाइट’नुसार, लॉकडाउनमुळे लोकं घरातचं आहे. त्यांमुळे त्यांच्या विरंगुळ्यासाठी आणि त्यांना त्यांच्या आठवणींमध्ये रमण्यासाठी पुन्हा एकदा ८० च्या दशकातील मालिका प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या मालिकांमध्ये ‘मालगुडी डेज’, ‘चाणाक्य’ आणि ‘द जंगल बुक’ या मालिकांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे सध्या ट्विटरवर #malgudidays हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी केलेल्या जोरदार मागणीमुळे या मालिका पुन्हा दाखविण्यात येतील अशी शक्यता आहे.

‘रामायण, महाभारत या मालिका प्रदर्शित करुन आम्ही एवढ्यावरच थांबणार नाहीये. तर या यादीत ‘चाणक्य’, ‘मालगुडी डेज’, ‘द जंगल बुक’ या सारख्या लोकप्रिय मालिकादेखील पुन्हा दाखवणार आहोत’, असं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवणार असल्यामुळे ‘शक्तिमान’ ही मालिकादेखील पुन्हा दाखवावी ही नवीन मागणीदेखील प्रेक्षकांकडून जोर धरु लागली आहे. त्यामुळे येत्या काळात दुरदर्शनवर नेमक्या कोणकोणत्या जुन्या मालिका पुन्हा दाखविण्यात येतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.