कन्नड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गेल्यावर्षी धुमाकूळ घातला. ‘केजीएफ चॅप्टर १ आणि २’ आणि रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिस वर छप्परफाड कमाई केली. १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांतारा’ने तर ४०० कोटींहून अधिक कमाई जगभरात केली . नुकताच या चित्रपटाच्या पुढच्या भागाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला. या दुसऱ्या भागाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते.

नुकत्याच सुरू असलेल्या ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’मध्ये ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार देण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर ‘IFFI’मध्ये पुरस्कार मिळवणारा रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा पहिला कन्नड चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही याबाबतीत पोस्ट शेअर करत लोकांना माहिती दिली आहे.

आणखी वाचा : Kantara 2 first look: गळ्यात रुद्राक्ष, हातामध्ये भाला अन् रिषभ शेट्टीचा रुद्रावतार; बहुचर्चित ‘कांतारा २’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

नुकतंच ‘IFFI 2023’मध्ये रिषभ शेट्टीने हजेरी लावली. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना तो म्हणाला, “कांतारा हा आपल्या मुळांशी जोडलेला चित्रपट होता त्यामुळेच तो लोकांना आपलासा वाटला. आज तो चित्रपट ज्या स्तरावर आहे तो केवळ आणि केवळ भारतीय प्रेक्षकांमुळे आहे.” याबरोबरच सध्या भाषेच्या सीमा पार करून प्रादेशिक चित्रपट जगभरात पोहोचत आहेत व त्यांची दखलही घेतली जात आहे याबद्दलही रिषभ शेट्टीने भाष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘प्रेक्षक ‘कांतारा २’ची आतुरतेने वाट बघत आहेत. १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांतारा’ने ४०७.८२ कोटींहून अधिक कमाई केली होती. तर त्याचा दूसरा भाग म्हणजेच प्रीक्वल ‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू,मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याचंही दिग्दर्शन रिषभ शेट्टीनेच केलं आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु २०२४ च्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.