‘गल्ली बॉय’, ‘पिंक’, ‘बागी ३’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा विजय वर्मा आज बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कोणाचीही ओळख किंवा फिल्मी बॅकग्राउंड नसताना त्याने भारतीय सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. अभिनेता होण्यासाठी त्याला संजय दत्तच्या ‘वास्तव’ या चित्रपटाने प्रेरीत केले होते. या चित्रपटातील ‘रघु भाई’ या व्यक्तिरेखेमुळेच तो अभिनेता झाला.
IANSला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “संजय दत्तचा ‘वास्तव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी केवळ १३ वर्षांचा होतो. हा पहिला चित्रपट होता जो मी चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिला होता. या चित्रपटाने माझं आयुष्यच बदललं. संजय दत्तने साकारलेली ‘रघु भाई’ ही व्यक्तिरेखा पाहून मी इतका प्रभावित झालो, की त्याचक्षणी मी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. जर त्यावेळी माझे वडिल ‘वास्तव’ पाहायला चित्रपटगृहामध्ये घेऊन गेले नसते तर मी आज अभिनेता नसतो.”
‘वास्तव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटात संजय दत्त व्यतिरिक्त रिमा लाघू, नम्रता शिरोडकर, परेश रावल, शिवाजी साठम, संजय नारवेकर, भरत जाधव यांसारख्या अनेक दिग्दज कलाकारांनी काम केले होते. हा चित्रपट बॉलिवूड इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.